डहाणू/बोर्डी: सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहाराशी जोडण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. आपल्याकडील व्यवहारातून वगळलेल्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी डहाणूतील विविध बँकांच्या शाखांमध्ये नागरिकांची पहाटेपासूनच गर्दी दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनाची सूत्र हाती घेतल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना बँक व्यवहाराशी जोडण्याचे स्वप्न पाहिले होते. या करिता विविध योजना राबविल्या परंतु विशेष प्रतिसाद लाभत नव्हता. मात्र पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या व त्या पन्नास दिवसांच्या आत बदलून घेण्याचे बंधन घातले. शिवाय एका दिवसासाठी बँक व्यवहार ठप्प करून एटीएम बंद केल्याने हाहाकार उडाला होता. त्यामुळे डहाणूतील नागरिकांनी विविध बँक व पोस्ट आॅफिस समोर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. हे चित्र शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही दिसून आले. आज पासून लागू केलेल्या बँक नियम व व्यवहाराशी अपरिचित असलेल्या शिक्षित वर्गाचीही त्रेधातीरपीट उडताना दिसली, तर ग्रामीण भागातील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आपल्याकडील नोटा बदलणे आणि त्या बदल्यात नवीन चलन प्राप्त करण्यास नागरिकांनी प्राधान्यक्रम दिल्याने अनुचित प्रकार घडला नाही. वरिष्ठ पातळीवरून बँक अधिकारी आणि कर्मचारी यांना या बाबात समन्वयाची भूमिका घेऊन कामाचा अतिरिक्त ताण सोसून, तहानभूक विसरून कर्मचाऱ्यांनी व्यवहार सुरू ठेवला. नोटा जमा केल्या जातील, मात्र पैशांचा साठा असे पर्यंत पैसे दिले जातील असे टीडीसीच्या डहाणू रोड शाखेचे व्यवस्थापक महेंद्र राऊत यांनी सांगितले. तर एचडीएफसी बँकेच्या डहाणू रोड शाखेत नागरिकांनी केलेल्या गर्दीचे वृतांकन करताना लोकमत वार्ताहराला फोटो घेण्यास मज्जाव केला. (वार्ताहर)
बँकेची पायरी चढायला लावलीच
By admin | Updated: November 11, 2016 02:49 IST