पालघर/नंडोरे : केंद्र शासनाने सोने-चांदी व व्यवहारावर १ टक्का अबकारी कर लागू होण्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर सराफ व्यावसायिकांचा बंद सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व सराफ व्यावसायिक व पालघर तालुका सराफ असोसिएशनने आज या निर्णयाविरोधात आक्रमक आंदोलन केले. संपूर्ण पालघर जिल्ह्याचे सराफ व्यावसायिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील झाले होते. जुना पालघर येथून निघालेल्या हा प्रचंड मोर्चा रेल्वे स्थानक परिसरात ठिय्या मांडून बसला होता.एक्साइज ड्युटी गो बॅक... अशी घोषणाबाजी करीत या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सराफ व्यावसायिकांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी या मोर्चेकऱ्यांमार्फत पालघर स्टेशन प्रबंधकांकडे आपले निवेदन सुपूर्द केले. हा शासन निर्णय मागे न घेतल्यास रेल रोको करून हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही निवेदनात या वेळी दिला आहे. पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी सराफ व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवत मोर्चात सहभागी झाले. पुढे जाऊन या मोर्चेकऱ्यांनी पालघरमधील हुतात्मा स्तंभाकडे काही वेळ रास्ता रोको करून केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा मार्गस्थ केला. हा बंद गेल्या १ महिन्यापासून चालूच आहे. (वार्ताहर)
पालघरमध्ये सराफांचा ठिय्या
By admin | Updated: April 2, 2016 02:56 IST