जव्हार : येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांनी होऊन त्यात अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. दि.२६ आॅक्टो. १५ रोजी झाली होती. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत पडलेली मोठी फूट व त्यांनी वेगळा गट स्थापन केल्याने सत्ताधारी अल्प मतात गेल्याने सर्वसाधारण सभा होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहराच्या विकासकामांबाबत धोरणात्मक निर्णय व सभेची मान्यता नसल्यामुळे कामांना मंजूरी मिळणे, निविदा प्रक्रिया, वार्षिक ठेके व महत्वाचे म्हणजे या वर्षीचा अर्थसंकल्प परिषदेच्या ९८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली, अशा परिस्थितीत या सभेत प्रशासन, सत्ताधारी व विरोधक कोणत्या विषयांना प्राधान्य देवून रखडलेला विकासासाठी एकविचाराने एकत्र येतात का या बाबत सामान्यांमध्ये उत्सुकता होती.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला प्रचंड प्रमाणात गळती लागून दररोज ४ लाख लिटर पाणी वाया जात होते ती थांबविण्यासाठी व ओढवणारे पाणी संकट टाळण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अभिनंदनाचा ठराव रियाज मणियार यांनी मांडला व त्यास अमोल औसरकर यांनी अनुमोदन दिले. तसेच भविष्याचा विचार करता त्या धरणाच्या खालील जागेत नवीन बंधारा बांधण्यासाठी सर्वेक्षण जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत करून घेण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात सत्ताधारी अस्तित्वात नसल्यामुळे वीज, पाणीपुरवठा, आरोग्य , घनकचरा याचे वार्षिक ठेके सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे दिले गेले नाही त्यामुळे गेल्या वर्षीच्या ठेकेदारांना मुदतवाढ द्यावी कि नव्याने निविदा मागविण्यात याव्यात? या विषयावरून वाद निर्माण झाला परंतु मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी ज्या ठेक्याला तांत्रिक मान्यतेची आवश्यकता नाही त्यांची निविदा प्रक्रिया १ महिन्यात पूर्ण करू असे सभागृहास सांगितले. अमोल औसरकर यांनी डम्पिंग ग्राउंड ची जागा बदलावी ते नागरीवस्तीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी पर्यायी जागेबाबत पाहणी करू असे आश्वासन दिले. नगरसेविका मीना जाधव यांनी पथदिप सुरु व बंद करण्यासाठी ठेकेदार नेमला जातो त्यामुळे जर या कामासाठी २ माणसांची नेमणूक केली तर न.प.चा आर्थिक फायदा होऊ शकतो यावर वैद्य यांनी प्रायोगिक तत्वावर ३ महिन्यासाठी असा प्रयोग करू असे सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संदीप वैद्य. उपनगराध्यक्षा आशा बल्लाळ, मुख्याधिकारी वैभव विधाते यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभागप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)
जव्हारच्या अनेक कामांना मंजुरी
By admin | Updated: April 24, 2016 02:08 IST