वाडा :दारू सोडविण्याच्या नावाखाली अघोरी प्रकार करून फसवणूक करणारे कांतिलाल आणि नंदकुमार देशमुख हे भोंदूबाबा गेल्या अनेक दिवसांपासून फरारी आहेत. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी ठाणे येथील सत्र न्यायालयात दावा दाखल केला असून त्याची सुनावणी मंगळवारी (दि. १८) होणार असल्याची माहिती तपास अधिकारी वाड्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.ते दोघे ओम शिव आरोग्यधाम या नावाने दारूमुक्ती केंद्र चालवत होते. नवऱ्याची दारू सोडविण्यासाठी त्याच्यासोबत आलेल्या पत्नीला ते भोंदूबाबा केंद्रात न्यायचे. तिला त्यातील एक भोंदूबाबा शंकराच्या पिंडीवर बसवून आपल्यावर देव प्रसन्न असल्याचा दावा करायचे आणि मी जे बोललो ते बाहेर कोणालाही सांगितले तर तुमचा संसार मोडेल, अपघात होईल, अशी भीती दाखवायचे. तसेच हे भोंदूबाबा दारू सोडविण्यासाठी आलेल्या प्रत्येकाकडून २८ हजार ५०० रु. घेत होते. या प्रकरणी देविदास पानसरे यांनी दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली. वाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, त्या आधीच हे दोघेही आरोपी फरारी आहेत. वाडा पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी नगर जिल्ह्यातील राजूवाडी येथे गेले होते. या पथकाने अन्य १५ रुग्णांचे जबाब नोंदविले असून त्यांचीही या भोंदूबाबांनी दारू सोडविण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. तसेच वाडा पोलिसांनी बाबांच्या घराची तपासणी केली असता घरातून काही महत्त्वाचे रजिस्टर जप्त केले असून यामध्ये सन २००८ पासून आजपर्यंतच्या ज्या रुग्णांवर उपचार केले आहेत, त्यांची नावे, गावे व घेतलेली रक्कम अशी माहिती लिहिली आहे. त्यांनी गेल्या ३० वर्षांत हजारो रुग्णांवर उपचार केले असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. (वार्ताहर)
भोंदूबाबांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
By admin | Updated: August 18, 2015 00:22 IST