सफाळे : वनविभाग क्षेत्रातील परिमंडळ तांदुळवाडी, लालठाणे येथे राखीव वन क्र.१०४ सर्वे नं.४१ मध्ये खोदकाम करत असताना ऐतिहासिक मूर्ती आणि पुरातन अवशेष सापडल्या आहेत. याबाबत वनविभागाने पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला आहे. लालठाणे येथे वनविभागामार्फत शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत जलशोषक चरी खोदण्याचे काम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना गावाच्या पश्चिमेकडे गुरुवारी चार मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती आठ से.मी.च्या लांबीच्या असून अनुक्रमे ०.२४४, ०.१४७, ०.२०६, ०.२५६ वजनाच्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी याच भागात एक पुरातन दगडी जाते सापडले होते. हे जाते ३४.९५० किलो वजनाचे आहे. ही घटना वन विभागाला समजताच वन अधिकारी रु चिता संखे यांनी घटनास्थळी जाऊन हे अवशेष काय आहे याची पाहणी करून ते ताब्यात घेतले. हे अवशेष सर्वेक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व मुंबई सर्कल सायन किल्ला येथे नेण्यात आले आहेत.सदर मूर्तींना ऐतिहासिक पार्श्वभूमी अथवा संदर्भ असण्याची शक्यता आहे. या मूर्ती आणि इतर काही ऐतिहासिक पुरातन अवशेष ज्या ठिकाणी सापडले आहेत त्याच्या पायथ्याशी तांदुळवाडी किल्ला आहे. या किल्ल्याचा आणि मिळालेल्या पुरातन मूर्तींचा काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याची मागणी इतिहासप्रेमींकडून होत आहे.
सफाळ्यातील लालठाणे गावात खोदकामात सापडल्या पुरातन मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:52 IST