हितेन नाईक, पालघरसफाळे, वैतरणा रेल्वे पुलालगत व खानिवडे, काशीद -कोपर या रेती बंदरामध्ये राजकीय वरदहस्ताच्या जोरावर बेकायदेशीररित्या रेती उपसा करणाऱ्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचे नेतृत्व स्वत: पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर हे करीत असून त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आजही ही कारवाई सुरूच ठेवली असून, पकडण्यात आलेल्या बोटी निकामी करून सक्शन पंप पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.सफाळे- वैतरणा रेल्वे पूलादरम्यानच्या पूल क्र मांक ९२ व ९३ या खालून रेती नौकांच्या वर्दळीला तसेच या पुलांच्या दोन्ही बाजूला सहाशे मीटर च्या आतील निषिद्ध क्षेत्रात नौकानयनास बंदी घालण्यात आली असतांनाही राजरोसपणे बेकायदेशीररित्या रेती उत्खनन होत असल्याचे वृत्त प्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यांमुळे त्याच्यावर कारवाईचे आदेश जारी झाल्यास त्याची आधीच पूर्व कल्पना रेती वाल्यांना दिली जात असल्याने पथकाला रिकाम्या हाताने परत फिरावे लागत होते. हि टीप महसूल विभागातूनच पेरली जात असल्याने रेतीवाल्यांचे धाडस वाढून त्यांची थेट मजल थेट वैतरणेच्या ९२ क्रमांकाच्या पुलाखालून राजरोसपणे रेती उत्खनन व वाहतूक करण्यापर्यंत वाढली होती. या अपरिमित रेती उपशामुळे या पुलाच्या लगतचा भाग पुन्हा खचल्याने पुलालाच धोका निर्माण झाला होता. अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शेवटी महडच्या सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले. आणि त्यांनी या भागाचा दौरा करून ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन पुला लगतचा ६०० मीटर भाग निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित केला होता. परंतु तरीही कायद्याची कुठलीही भीती उरली नसल्याने बेकायदेशीर रित्या सक्शन पंपाद्वारे रेती उत्खनन सुरूच होते. रेती माफियांचे अनेक राजकीय आणि महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याचे सर्वश्रुत असल्याने पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आपल्या विश्वासातील अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व तलाठी यांचे विशेष पथक स्थापून त्याद्वारे ५ ते ६ नोव्हेंबर रोजी अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली. जिल्हाधिकारी हे वैतरणा बंदरामध्ये धाड टाकणार ही माहिती मिळाल्याने रेती काढणारे हे खानिवडे व काशीद कोपर याठिकाणी स्थलांतरित झाले होते. मात्र या विशेष पथकाने नेमक्या या दोन्ही ठिकाणी छापे टाकल्याने गैरमार्गाने रेती उत्खनन करणाऱ्या बोटी व सक्शन पंप पथकाच्या हाती सापडल्या. या अंतर्गत दोन बोटी, पंधरा सक्शन पंप उद्ध्वस्त करण्यात आले. याखेरीज ३६ सक्शन पंपांना ताब्यात घेण्यात आले असून ११० रेती चाळणीचे खड्डे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली.
अवैध रेतीवर कलेक्टरांची कारवाई
By admin | Updated: November 8, 2016 02:08 IST