ठाणे : वसुंधरादिनीच १४०० वृक्षतोडीचे प्रस्ताव पटलावर आपल्या मनमानीने मंजूर करणाऱ्या पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना एकाच दिवसात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चपराक लगावली आहे.पोखरण रोड नं. २ मधील एकही वृक्ष न तोडता रस्ता रुंदीकरणाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता या रस्त्यातील ११७० वृक्षांना जीवदान मिळणार आहे. १४०० वृक्षतोडीसंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये शनिवारी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन आयुक्तांनी हे पाऊल उचलले.आयुक्तांनी लोकमच्या वृत्ताची दखल घेऊन पोखरण रोड नं. २ मधील एकाही वृक्षाला हात लावला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रस्ता रुंदीकरण मोहिमेमध्ये अनेक झाडांची कत्तल केली जाणार होती. परंतु, आयुक्तांच्या या निर्णयामुळे पोखरण रोड नं. २ येथील नारळ, सीताफळ, कारंज, गुलमोहर, रॉयल पाम, गिरीपुष्प, शेवगा, सुबाभूळ, सुपारी पाम, अशोका, पुत्रंजीवा, विलायती चिंच, बोर, करंज, विल्ड चेरी, कदंब, जांभूळ, टॅबोबिया, ताम्हण, बहुनिया, बकुळ, काजू, साग, सोनचाफा, अनंता आदींसह इतर अशा २३५ आणि पोखरण रोड नं. २ ते माजिवडा जंक्शनपर्यंत ९३५ अशा एकूण ११७० वृक्षांना जीवदान मिळणार आहे. दरम्यान, आयुक्तांनी सध्या वाहतुकीसाठी अस्तित्वात असलेल्या रस्त्याची रुंदी न वाढवता फुटपाथला जोडूनच सर्व्हिस रस्ता बनवण्याचे आदेश बांधकाम विभाग, उद्यान आणि शहर विकास विभागाला दिले आहेत. यामुळे शहरातील पर्यावरणवादी नागरिकांत समधान व्यक्त केले जाते आहे. (वार्ताहर)
११७० वृक्षांना देणार जीवदान
By admin | Updated: April 25, 2016 02:50 IST