समाजकल्याण व महिला बालकल्याणचे सभापती ठरले : शिक्षण व कृषी कोणाला; प्रतीक्षा कायम वर्धा : जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापतींची निवडणूक शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. येथे भाजपाची एकहाती सत्ता असल्याने चारही सभापती भाजपलाच मिळणार यात दुमत नव्हते. यात सभागृहात झालेल्या निवडणुकीत सभापतीपदाकरिता नामांकन अर्ज सादर करणाऱ्या भाजपाच्या चारही उमेदवारांना भाजपा, राकॉ आणि सेनेने मतदान केले. यामुळे त्यांना ३६ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवारांना एका अपक्षाने पाठींबा दिल्याने १४ मतांवर समाधान मानावे लागले. झालेल्या निवडणुकीत समाजकल्याण सभापती म्हणून ठाणेगाव सर्कलच्या निता गजाम यांची वर्णी लागली तर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती म्हणून येळाकेळी सर्कलच्या सोनाली कलोडे यांची वर्णी लागली. या दोघांनीही आजच पदभार स्वीकारला तर इतर विषय समितीचे सभापती म्हणून आंजी (मोठी) सर्कलच्या जयश्री गफाट आणि भिडी सर्कलचे मुकेश भिसे यांची निवड झाली. या दोघांपैकी शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंर्धनाचा भार कोणाच्या खांद्यावर जातो याची प्रतीक्षा आहे. याची घोषणा अध्यक्ष नितीन मडावी १९ एप्रिलला करतील, असे बोलले जात आहे. तरीही शिक्षण व आरोग्य सभापतीपदी जयश्री गफाट आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून मुकेश भिसे यांनी वर्णी लागणार असल्याची भाजपाच्या अंतर्गत गोटातील चर्चा आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सकाळी ११ वाजता प्रक्रियेला प्रारंभ झाला. यावेळी भाजपाचे सर्वच सदस्य एकाच वेळी सभागृहात दाखल झाले तर कॉग्रेसचे सदस्यही वेळेवर हजर झाले. यात दुपारी १२ वाजेपर्यंत नामांकन अर्ज स्वीकरण्यात आले. यात भाजपाच्यावतीने निता गजाम तर काँग्रेसच्यावतीने सुकेशिनी धनविज यांनी समाजकल्याण सभापतीकरिता नामांकन दाखल केले. महिला बालकल्याणकरिता भाजपाच्यावतीने सोनाली कलोडे तर काँग्रेसच्यावतीने वैजंती वाघ तसेच इतर समित्यांकरिता भाजपाकडून जयश्री गफाट व मुकेश भिसे यांनी तर काँग्रेसकडून मुकेश कराळे व विवेक हळदे यांनी नामांकन अर्ज दाखल केले. दरम्यान दुपारी २ वाजता मतदानाकरिता विशेष सभा सुरू झाली. या सभेत भाजपाच्या उमेदवारांना भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे दोन आणि रिपाइं एक या सदस्यांनी मतदान केले. यामुळे त्यांना प्रत्येकी ३६ मते मिळाली तर काँग्रेसच्या १३ आणि एक अपक्ष सदस्याने मतदान केल्याने काँग्रेसच्या उमेदवारांना १४ मते मिळाली. या निवडणुकीत बसपाचे दोनही सदस्य सभागृहात तटस्थ राहिले. ते अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीतही सभागृहात उपस्थित राहून तटस्थ होते. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीत गैरहजर असलेल्या सेनेने आज सभागृहात हजेरी लावत भाजपाला मतदान केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी व उपाध्यक्ष कांचन नांदूरकर यांच्यासह भाजपाच्या गटनेत्या सरोज माटे व काँग्रेसचे गटनेता संजय ंिशंदे यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते. निवडणुकीची प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी पार पाडली. त्यांना जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
जि.प. विषय समित्यांच्या सभापतींची निवड
By admin | Updated: April 2, 2017 00:42 IST