सभा गाजली : अखेर त्या अधिकाऱ्यांचा प्रभार काढण्याचा सर्वानुमते ठराववर्धा : सर्वसाधारण सभेच्या ठरावाला डावलून बदली झालेल्या अधिकाऱ्यांना पदमुक्त केल्याच्या प्रकरणाने शनिवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरच उलटली.जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत, समाज कल्याण अधिकारी जया राऊत आणि लेखा विभागातील कोल्हे यांच्या बदल्या झाल्या. यापूर्वी ३० आॅगस्ट रोजी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सदर अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकारी येत नाही तोपर्यंत त्यांना पदमुक्त करुन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे त्यांचा प्रभार देऊ नये, असा ठराव सर्वसाधारण सभेने पारीत केला. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी तो ठराव डावलून मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सदर या अधिकाऱ्यांना पदमुक्त करुन त्यांचा प्रभार मर्जीतील अधिकाऱ्यांना दिला. ज्या अधिकाऱ्यांकडे सदर विभागाचा प्रभार दिला त्यातील एका अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीमुळे सिंचन विभागाचा निधी परत गेला. हा सर्वसाधारण सभेचा अवमान असल्याचा मुद्दा जि.प. सदस्य विलास कांबळे यांनी आजच्या सभेत उचलून धरला. यावरुन सभागृह आणि सीईओ यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. सीईओ चौधरी यांनी हा विषय सभागृहात मांडण्याची गरज नाही. यावर आपल्या कक्षात चर्चा करता आली असती, अशी भूमिका घेतली. सदस्य आपले विषय सभागृहात नाही तर केबिनमध्ये मांडणार काय, असा सवाल कांबळे यांनी उपस्थित करुन सीईओंच्या या भूमिकेचा निषेध नोंदविला. त्यांच्या मदतीला जि.प. सदस्य मिलिंद भेंडेही धावून आले. सभागृहातील वातावरण सीईओ विरुद्ध सदस्य असे झाले होते, असे अन्य सदस्यांचे म्हणणे आहे. अखेर सभागृहात सदस्यांचे एकमत विचारात घेता ज्या अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला. त्यांच्याकडून प्रभार काढून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र या ठरावालाही सीईओंचा विरोध असल्याचा आरोप जि.प. सदस्य सभागृहाबाहेर करीत होते.३० आॅगस्ट रोजीच्या सभेत वेळेअभावी काही महत्त्वपूर्ण विषय राहुन गेले होते. या अनुषंगाने ही सर्वसाधारण सभा जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांच्या अध्यक्षेखाली पार पडली. या सभेला उपाध्यक्ष संजय कामनापुरे, बांधकाम व अर्थ समिती सभापती गोपाल कालोकर, समाज कल्याण सभापती नंदकिशोर कंगाले, महिला व बाल कल्याण सभापती निर्मलाताई बिजवे यांच्यासह सदस्यगण उपस्थित होते. सभेत उर्वरित विषय पटलावर घेऊन त्यांना मंजुरी देण्यात आली.(जिल्हा प्रतिनिधी)
जि.प. मध्ये सीईओंना घरचा अहेर
By admin | Updated: September 7, 2014 00:02 IST