मंगेश जोशी : १८७ वा प्रहारच्या अॅडव्हेंचर कॅम्पचा समारोपवर्धा : ‘देश प्रथम’ ही भावना युवापिढीत रूजविण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विपरित परिस्थितीशी झुंज देण्याचे सामर्थ्य, समाजाप्रती आपुलकी व कृतीतून योग्य संस्कार प्रतिबिंबीत करण्याची गरज आहे. प्रहार समाज जागृती संस्थेचे प्रशिक्षण याच धर्तीवर असल्याने प्रहारचे सैनिकी प्रशिक्षण तरूण-तरूणींना देणे गरजेचे आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी व्यक्त केले. प्रहारच्या १८७ व्या अॅडव्हेंचर शिबिराच्या समारोप शुक्रवारी सेवाग्राम येथील शहीद राजीव दीक्षित भवन येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रहार संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप दाते तर अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. शिबिरात जिल्ह्यातील निवडक ५५ मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.पगार यांनी प्रहार संस्थेचे प्रशिक्षण खडतर असून आजच्या बालकांना तसेच युवापिढीला अशा प्रशिक्षणाची आवड आहे. प्रहारचा कॅम्प इतर शिबिरापेक्षा आगळावेगळा असतो, असे सांगितले. अग्रवाल यांनी प्रहारच्या प्रशिक्षणातून सैनिकी मानसिकता समाजात निर्माण होत आहे, असे सांगितले. बेलखोडे व दाते यांनी मागील २२ वर्षांपासून साहसी शिबिर घेतले जात असल्याचे सांगितले.प्रहार अॅडव्हेंचर कॅम्पच्या समारोप प्रसंगी सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरात प्रहारींनी चित्तथरारक १५ प्रकारचे अडथळा पार प्रशिक्षणाचे प्रात्याशिक सादर केले. कार्यक्रमाची सुरूवात ‘शहिदो की चिताओ पर खडी हुई स्वतंत्रता आज लडखडा रही है, क्या हुआ नही पता!, मेरे वतन...’ या देशभक्तीपर गीताने प्रहारींनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी नालवाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्यावतीने शिबिरार्थ्यांना ‘पेन पाऊच’ भेट करण्यात आले. दरम्यान, बाळकृष्ण हांडे, डॉ. शोभा बेलखोडे, सुप्रभात बावनगडे व चेतन खडसे यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविकातून गुजरकर यांनी प्रहार संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संतोष तुरक यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र गुजरकर यांनी मानले. साहसी शिबिर तथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता अश्विनी घोडखांदे, वैशाली गुजरकर, स्वप्नील शिंगाडे, धीरज कामडी, मंगेश शेंडे यांच्यासह प्रहार स्वयंसेवकांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
युवक-युवतींना सैनिकी प्रशिक्षण आवश्यक
By admin | Updated: May 2, 2017 00:20 IST