आतापर्यंत १७ गुरांचा मृत्यू : अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सिंदी (रेल्वे) : शहरात रस्त्याच्या कडेला कचऱ्यावर पडून असलेले प्लास्टिक खाल्ल्याने येथील चंद्रशेखर जनार्दन बेलखोडे यांच्या आठ गाई, सहा बकऱ्या व तीन वासरे दगावली. याला पालिकेचे स्वच्छतेबाबत असलेले उदासीन धोरण जबाबदार असल्याचा आरोप करीत बेलखोडे याने गुरुवारी पालिकेसमोरच आपल्या गाईसोबत उपोषण सुरू केले आहे. शहराने अस्वच्छतेचा कळस गाठला. यात बंदी असताना व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक थैल्यांचा वापर होत आहे. या थैल्या नागरिकांकडून वापर झाल्यानंतर रस्त्यावर टाकण्यात येत आहे. रस्त्यावर असलेल्या या थैल्या मोकाट फिरत असलेल्या जनावरांच्या खाण्यात जातात. असाच प्रकार बेलखोडे यांच्या जनावरासंदर्भात घडला. यात त्यांची गुरे दगावल्याने त्यांना मोठा झटका बसला. त्यामुळे मृत गुरांची नुकसान भरपाई मिळावी तसेच शहरात स्वच्छता नांदावी याकडे लक्ष वेधण्याकरिता बेलखोडे यांनी उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व न.प. प्रशासन याच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. उपोषणस्थळी काँग्रेसचे गटनेते व नगरसेवक आशिष देवतळे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक अजय कलोडे, खरेदी विक्री संस्थेचे संचालक सुधाकर वाघमारे, समाजसेवक अशोक सातपुते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती दर्शवून दर्शविली.(प्रतिनिधी)
सिंदी पालिकेसमोर गायींसह युवकाचे उपोषण
By admin | Updated: September 23, 2016 02:25 IST