पालकमंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड : नाट्यगृह, बसस्थानक नुतनीकरण व गांधी फॉर टुमारोचा मार्ग मोकळावर्धा : सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने विकास पुरुष म्हणून ख्याती असलेला पालकमंत्री गांधी जिल्ह्याला लाभला. तेव्हाच जनतेनी त्यांचे मनोमन स्वागत केले. इतकेच नव्हे, खऱ्या अर्थाने जिल्हा विकासाची घोडदौड करेल, अशा अपेक्षा जनतेकडून व्यक्त होऊ लागल्या. ना. मुनगंटीवार यांनी जनतेच्या भावनांचा आदर करीत जिल्ह्याची अपेक्षापूर्तीकडे वाटचाल सुरु केल्याचा सूर जनतेतून ऐकायला मिळत आहे. भाजप-सेना युती सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होणार असली तरी ना. मुनगंटीवार पालकमंत्री झाल्यापासून वर्धा अपेक्षापूर्तीकडे वाटचाल करीत असल्याचेही राजकीय जाणकार बोलायला लागले आहे. ना. मुनगंटीवार पालकमंत्री झाल्यापासून ते जिल्ह्याशी सतत संपर्कात असून त्यांची नाळ जिल्ह्याशी जुळली आहे. येथील राजकीय, सामाजिक, सांस्कृितक घडामोडीही त्यांच्याशिवाय होत नसल्याचे दिसून येते. राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री असल्यामुळे त्यांच्या व्यस्ततेची कल्पना वर्धेकरांना आहे. असे असले तरी त्यांनी जेव्हा जेव्हा जिल्ह्यात पाय ठेवला, तेव्हा त्यांचे पदोपदी होणारे जंगी स्वागत त्यांनी अल्पावधीत जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग मोकळा करुन दिला याची पावती देणारा असल्याचे ऐकायला मिळते. त्यांनी प्रत्येक दौऱ्यात महत्त्वपूर्ण घोषणा केल्याचे दिसून येते.२५ कोटींच्या ‘गांधी फॉर टुमारो’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कार्यवाहीला गती दिली. यामुळे रखडलेला आराखडा तयार करण्याचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील कुटीर व लघू उद्योगांना चालना मिळावी म्हणून सेवाग्रामला २५ कोटी खर्चून प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. जिल्ह्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी दखलपात्र असतानाही नाट्यगृह नाही. यामुळे कलावंतासह आणि सुप्तगुण असतानाही व्यासपीठाअभावी हिरमोड झालेल्या वर्धेकरांच्या इच्छापूर्ती साठी ना. मुनगंटीवार यांनी नाट्यगृहाची घोषणा केली. ही बाब कलावंतानाही सुखावर आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे. शहिदांचा इतिहास असलेला आष्टी तालुका उपेक्षित असल्याचे हेरुन ना. मुनगंटीवार यांनी आष्टीत हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहुन आष्टीच्या विकासासाठी ५ कोटींची घोषणा कार्यवाहीचे निर्देश लगेच जिल्हा प्रशासनाला दिले. सिंदी(रेल्वे)च्या विकासासाठी २ कोटींचा निर्णय झाला असून कार्यवाही सुरू झालेली आहे. वर्धेतील बसस्थानकाच्या नुतनीकरणाला मंजुरी प्रदान केली. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मोठ्याप्रमाणावर निधीची उपलब्धता करुन दिलेली असून यावरही कार्यवाही सुरू झालेली आहे. वर्धा जिल्ह्यात जल परिषद घेऊन पाणी अडविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेणार असल्याची माहिती राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
नव्या सरकारची वर्षपूर्ती; गांधी जिल्ह्याची अपेक्षापूर्ती
By admin | Updated: October 31, 2015 03:01 IST