सीबीएसई : लॉएड्स, नवोदय, केंद्रीय विद्यालयाचा १०० टक्के निकालवर्धा : सीबीएसई अभ्यासक्रमातील बाराव्या वर्गाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात भूगाव येथील भवन्स लॉएड्स विद्यानिकेतनच्या विज्ञान शाखेची प्रियल श्रीवास्तव ही ९४.२ टक्के घेत जिल्ह्यातून तर सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाचा यशवंत सोनटक्के हा ९१ टक्के गुण घेत मुलांमधून प्रथम आला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमात इयत्ता बारावीपर्यत शिक्षण देणाऱ्या शाळांत लॉएड्स विद्यानिकेतन, नवोदय विद्यालय, पुलगाव येथील केंद्रीय विद्यालयासह यंदाच्या वर्षात पहिल्यांदा बाराव्या वर्गाचा निकाल देणारी सावंगी येथील अल्फोन्सा सेकंडरी स्कूलचा समावेश आहे. यातील लॉएड्स, नवोदय विद्यालय व पुलगावच्या केंद्रीय विद्यालयाने शंभर टक्के निकाल दिला तर अल्फोन्सा शाळेचा निकाल ९३.२ टक्के लागला आहे. नवोदय विद्यालयातून विज्ञान शाखेतून ४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या शाळेतून सोनल डोबले ही ९३.४ टक्के घेत प्रथम आली. ती जिल्ह्यात दुसरी ठरली. पुलगावच्या केंद्रीय विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या शाळेतून जानवी धाकटे ही ९०.४ टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम आली. तर अर्पित धोबे हा ८७.६ टक्के घेत दुसरा आला. भवन्स लॉएड्स विद्यानिकेतनच्या विज्ञात शाखेतील ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. वाणिज्य शाखेतून १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात पियूष लंगडे हा ९०.४ टक्के घेत शाळेतून प्रथम आला. या शैक्षणिक सत्रात पहिल्यांदा बारव्या वर्गाचा निकाल देणाऱ्या अल्फोन्सा विद्यालयातील सायली भेले ८८.६ टक्के गुण घेत शाळेतून प्रथम तर लूसी थॉमस ८७.४ टक्के गुण घेत द्वितीय आली.(प्रतिनिधी) १७१ पैकी १६८ विद्यार्थी उत्तीर्ण जिल्ह्यात चार शाळांमिळून एकूण १७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भवन्स लॉएड्स विद्यानिकेतन, नवोदय विद्यालय आणि पुलगाव येथील केंद्रीय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के तर अल्फोन्सा विद्यालयाचा निकाल ९३.२ टक्के लागला.
प्रियल श्रीवास्तव जिल्ह्यात तर मुलांमधून यशवंत सोनटक्के प्रथम
By admin | Updated: May 22, 2016 01:48 IST