वर्धा : गणेश विसर्जनानंतर सर्वत्र नद्यांचे पात्र प्रदूषित झाले. अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत कचऱ्याने बरबटलेले नदी पात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. देवळी येथील एसएसएनजे महाविद्यालयाच्या रोव्हर्स, रेंजर्स व राष्ट्रीय हरित सेनेने यशोदा तर पवनार धाम नदीवर न्यू आर्टस कॉलेज व गांधी अध्ययन केंद्राद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देवळी येथील एसएसएनजे महाविद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोव्हर पथक, राणी लक्ष्मीबाई रेंजर युनिट व राष्ट्रीय हरित सेनेच्या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जनानंतर देवळी शहरालगतच्या यशोदा नदीचे प्रदूषित झालेले पात्र स्वच्छ केले. सदर उपक्रम रोव्हर लीडर तथा स्काऊटचे सहायक जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर व रोव्हर लिडर संतोष तुरक यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. यात २० रोव्हर्स, २० रेंजर्स व २५ राष्ट्रीय हरित सेनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी जोपासत पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत रोव्हर्स व रेंजर्सनी यशोदा नदीच्या पात्रात साचलेला केरकचरा व भाविकांनी वाहिलेले निर्माल्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. नदीच्या काठावर जमा झालेल्या गणेश मूर्ती खोल पाण्यात विसर्जित करण्यात आल्या. नदी स्वच्छ ठेवा उपक्रमाद्वारे घरोघरी जावून पर्यावरणपूरक सण साजरा करा, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला आश्विनी घोडखांदे, उमा मसराम, स्मिता सुरजूसे, वैभव भोयर, आशिष परचाके, रवी बकाले, हेमंत चौधरी, स्वप्निल शिंगोडे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)समाजकार्यच्या विद्यार्थ्यांचे योगदान४न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज व गांधी अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पवनार येथे समाजकार्य विभागाद्वारे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला.४पवनार येथील धाम नदीपात्रात वर्र्धा शहरातील सर्व सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरून नदीपात्र दूषित होत होते. परिसरात कचरा, प्लास्टिक, निर्माल्य अस्ताव्यस्त पडून होते. परिसरात घाणीचे साम्राज्य होते. प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे यांनी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत हा उपक्रम हाती घेतला. निर्मलग्राम ही संकल्पना हाती घेत निर्मल नदीची संकल्पना जोपासली गेली. यावेळी प्रा. मनीष भोयर, प्रा. प्रभाकर पुसदकर, प्रा. आरती पुसदकर, प्रा. रश्मी पडुके, प्रा. प्रतीक ठाकरे यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.
अनेकांच्या पुढाकाराने यशोदा व धाम नदी स्वच्छ
By admin | Updated: October 6, 2015 03:01 IST