फलकामुळे अनेक प्रश्न उपस्थित : कामाच्या कासवगतीने आश्चर्यविजय माहुरे सेलूयेथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या निवासस्थानाचे बांधकाम दोन वर्षापासून सुरू आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी संपून एक वर्ष झाले आहे. दोष दुरुस्तीचा कालावधीही अवघे तीन महिने राहिला आहे. असे असताना आजही बांधकाम सुरूच आहे. त्यातच मंगळवारी लावलेला ‘तो’ फलक काम कासवगतीने सुरू असल्याचे दर्शवित आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी रुग्णालया परिसरातच निवासस्थान बांधण्यासाठी २०१२-१३ मध्ये कंत्राटदाराकडून या बांधकामाचा करारनामा करण्यात आला. यासाठी प्रशासकीय मान्यतेनुसार ३४९.१५ लाख रूपये मंजूर करण्यात आले. ३१५.२५ लाख रूपयाची तांत्रिक मान्यता मिळाली. करारनाम्यानुसार या बांधकामाची किंमत २९९.७३ लाख आहे. मात्र दोन वर्षापासून येथील निवासस्थानाचे बांधकाम सुरूच आहे. पण २९ डिसेंबरला या बांधकामाच्या ठिकाणी या बाबतची माहिती देणारा फलक लावण्यात आला. या फलकावर काम सुरू झाल्याची तारीख ३० मार्च २०१३ अशी दर्शविण्यात आली. सदर बांधकाम १३ महिन्यात पूर्ण होणे गरजेचे होते. त्यानुसार निव्वळ बांधकाम हे ३० एप्रिल २०१४ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. एवढेच नव्हे तर काम पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून या कामात असणाऱ्या दोषाची दुरुस्ती २४ महिन्यापर्यंत करावयाची आहे. त्यानुसार दोष दुरुस्ती मार्च १६ पर्यंत करावी लागणार होती. पण अजूनही या निवासस्थानाचे बांधकामच सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून काही महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बांधकामाची माहिती दर्शविणारा फलक मंगळवारी २९ डिसेंबरला लावण्यामागचे कारण काय हे कळायला मार्ग नाही. दोष दुरुस्तीचाही कालावधी संपल्यानंतर या बांधकामाचे उद्घाटन होईल. त्यामुळे बांधकामात असणाऱ्या दोषच्या दुरुस्तीचे काय होईल असा प्रश्न हा फलक पाहून सर्वसामान्यांना पडत आहे. सदर काम सा. बा. विभागाच्या यंत्रणेखाली कार्यान्वित आहे. कामाची गती पाहाता काम कधी होणार हा प्रश्नच आहे.
कालावधी संपूनही काम सुरूच
By admin | Updated: December 31, 2015 02:23 IST