वायगाव (नि.) : जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्याशिवाय ते शक्य नाही. दारूबंदीकरिता महिलांनी एकत्र येवून त्यांच्यातील दुर्गेचे रूप समोर आणल्यास दारूबंदी अशक्य नाही, असे विचार अल्लीपूरचे ठाणेदार विजय मगर यांनी व्यक्त केले.आलोडा (बोरगाव) येथील महिलांनी गावात सावित्रीबाई फुले दारूबंदी महिला मंडळ, आणि क्रांतीवीर दारूबंदी पुरुष मंडळ स्थापन केले. यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशांत निमसडकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष सुरेखा भगत, सचिव दूर्गा टिपले, उपाध्यक्ष सुमन राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी विजय मगर यांनी दारूबंदीकरिता मला दुरध्वनीवर माहिती द्या, मी क्षणात हजर होईल असे म्हणून कायदा हातात घेण्याचे टाळावे असे मंडळांच्या सदस्यांना सांगितले. सभेतील महिलांच्या समस्येची त्यांनी आपुलकीने विचारणा केली. या सभेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अन्य गावातील महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केली. गावातून दारू कायमची हद्दपार करण्यासाठी महिलांनी आता दूर्गेचे रूप धारण करण्याची गरज असल्याचेही मत मगर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.(वार्ताहर)
महिलांनी दारूबंदीसाठी दुर्गेचे रूप घ्यावे
By admin | Updated: November 24, 2014 23:03 IST