वायगाव(नि.) : अल्पेश हत्या प्रकरणातील एकमेव साक्षीदार विलास पांडुरंग उगेमुगे (२४) याची आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याला बयाण नोंदविण्याच्या नावावर तब्बल तीन दिवस सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठेवले होते. ठाण्यातून घरी येताच त्याने आत्महत्या केल्यामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे.अल्पेश सुरेश ओंकार हा नेरी (मिरापूर) येथील रहिवासी होता. तो २७ सप्टेंबरला घरून निघून गेला. २९ सप्टेंबरला देऊळगाव-भुगाव शिवारातील एका विहिरीत त्याचा मृतदेहच आढळला. अल्पेश हा पट्टीचा पोहणारा असल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. कुटुंबीयांनीही अल्पेशही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनीही तपासाला योग्य दिशा दिली. अखेर तब्बल तीन महिन्यांनी का होईना अल्पेशची हत्या असल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. अल्पेश घरून गेला तेव्हा त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर काम करणारा विलास उगेमुगे हा या घटनेचा एकमेव साक्षदार होता. सेवाग्राम पोलिसांनी दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्याचे तोंडी बयाण घेतले. दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पुन्हा बयाण नोंदविण्याच्या नावावर पोलिसांनी त्याला सोबत नेले. यानंतर दि. १४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पोलीस त्याला घेऊन त्याला भुगाव येथे घरी घेऊन आले. घरी त्याला आंघोळ करू दिली. अर्ध्या तासांनी पुन्हा सोबत सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेले.दि. १५ डिसेंबरला त्याची साक्ष नोंदविण्यात आली. नंतर त्याला त्याच्या आई-वडिलाकडे आॅटोतून सोडून पोलीस परत गेले. आॅटोतून उतरुन घरात जाताच विलासने विष प्राशन केले. यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला बयाण नोंदवायलाच नेले होते. तर त्याला तब्बल तीन दिवस पोलीस ठाण्यात का ठेवले. विलास ज्या प्रकरणाचा एकमेव साक्षदार होता. त्यावर साक्ष नोंदवू नये, यासाठी पोलिसांकडून दबाब तर नव्हता ना, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. विलासने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असावे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याबाबत पोलीस मात्र अल्पेश हत्या प्रकरणातील आरोपींच्या धमकीमुळे विलासने आत्महत्या केली असावी, असा जावईशोध घेत आहे.(वार्ताहर)
‘त्या’ साक्षीदाराची आत्महत्या संशयास्पद
By admin | Updated: December 20, 2014 01:57 IST