सुधारित पैसेवारी जाहीर : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती वर्धा : जिल्ह्यात मोठ्या अंतराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली. असे असताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने टेबलावर बसून नजर अंदाज पैसेवारी काढून दुष्काळ नसल्याचा दिव्य खुलासा केला होता. यावर जिल्ह्यातून सर्वच स्तरावरून पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी सुरू झाली. दरम्यान शासनाच्यावतीने सुधारीत पैसेवारी जाहीर झाली. यात जिल्ह्यातील १ हजार ३४० गावात ५० च्या आत पैसेवारी असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीच्या उतारीत कमालीची घट झाली. एकरी दोन पोत्यांचा उतारा आला. काहींनी तर सोयाबीन सवंगण्याऐवजी त्यावर ट्रॅक्टर चालविले. असे असताना जिल्ह्यात सुबकता असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर केले होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेली नजरअंदाज पैसेवारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ असल्याची ओरड सर्वत्र होवू लागली. जिल्ह्यात पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी जोर धरत होती.याकरिता विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी आंदोलने केली. अशात जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी जिल्ह्याचे वास्तव सांगणारी ठरत आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८७ गावांची सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात शहरीकरण झालेले गाव व रिठ गाव अशी एकूण ४७ गावे वगळता १ हजार ३४० गावात नापिकी झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात सर्वाधिक गावे समुद्रपूर तालुक्यातील आहेत. येथे एकूण २१९ गावांतील पैसेवारी ५० च्या आत आली आहे. इतर तालुक्याची स्थितीही तशीच आहे.(प्रतिनिधी)
१,३४० गावातील पैसेवारी ५० च्या आत
By admin | Updated: November 20, 2015 02:30 IST