तळेगाव (श्या़पं़) : महाराष्ट्र पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्याकरिता मागील १० वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचे बजेट तयार केले जात आहे; पण या दलाची यंत्रणा सुधारण्यासाठी यातील निधी खर्च होत नसल्याचे दिसते़ पोलिसांचे वेतन व भत्ते याचे निकष जुनेच आहे़ या रकमेत कामकाज व कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत सर्वांनाच भेडसावताना दिसतो़ यामुळे पोलिसांना वेतनवाढ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़सध्या पोलिसांना तलाठी व ग्रामसेवकाच्या बरोबरीचेही वेतन मिळत नाही. उलट त्यांच्या भाडे भत्त्यातही कपात करण्यात आली आहे़ यामुळे पोलीस विभागात असंतोष पसरला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाला, तसा राज्य कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ लागू झाली. यात पोलीस विभाग वगळता इतर सर्व राज्य कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ होत आहे़ या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात वेतन कमी पडते, अशी ओरड झाली़ यावरून माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पोलीस दलाचे वेतन वाढवून देण्याचे आश्वासने दिले होते. त्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठित केली. त्या समितीने राज्य शासनाला वेतनवाढीचा प्रस्तावही सादर केला; पण शासनाने या प्रस्तावाला प्राधान्य दिले नसल्याचे दिसते. गृहमंत्र्यांच्या घोषणा वल्गनाच ठरल्या. पोलिसांच्या हाती काहीच आले नाही. वेतन तर वाढले नाही, उलट घरभाडे भत्ता २६० रुपये मागील वर्षापासून कमी करण्यात आला़ सध्या खोली भाड्याचे दर बाजार भावाप्रमाणे महिन्याकाठी अडीच ते तीन हजार रुपये असताना पोलिसांना १५०० रुपयांचे भाड्याचे घर कसे मिळणार, हा प्रश्नच आहे़ पोलिसांना घरभाडे भत्ता हा त्यांच्या वेतनाचे १० टक्के इतका मिळतो. परिणामी, घरभाड्याची वाढीव रक्कम पोलिसांना वेतनातून द्यावी लागते. नवीन शासनाने याकडे लक्ष देत तरतूद करावी, अशी मागणी करण्यात येत आहे़(वार्ताहर)
पोलिसांना वेतनवाढ कधी मिळणार?
By admin | Updated: November 23, 2014 23:24 IST