सेलू : तालुक्यातील काही भागात अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांना वैतागून सोडले आहे. पाऊस येईल या आशेवर लावलेल्या बियाण्याचे अंकुर उगविण्याआधीच करपले आहे. ओलिताची सोय आहे; मात्र शेतातील मोटारपंप मनमानी भारनियमनाने सतत तासभरही चालत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.कान्हापूर - रमणा परिसरातील शेतकरी सध्या रडकुंडीला आले आहे. पाऊस गायब झाला आहे. प्रचंड उकाडा आहे. लावलेले कपाशीचे बियाणे जगविण्यासाठी ओलिताची सोय असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांनी मोटारपंप चालू केला व तो दुसऱ्या कामात लागला की काही वेळातच वीज जाते. पुन्हा काही वेळात येते. या हुलकावणीमुळे शेतात लावलेले ठिबक व स्प्रिंंकलर धड काम करीत नाही. प्रत्येक वेळी वीज गेल्यावर पुन्हा-पुन्हा मोटारपंप चालू करण्याची वेळ येते. या कटकटीमुळे पाण्याची सोय असूनही अनेकांनी स्प्रिंकलर व ठिंबक संच लावलेच नाही. ज्यांनी लावले त्यांची योग्य ओलित होत नाही. त्यामुळे अंकुरलेले रोपटे करपून जात आहे. पोटाला चिमटा काढून तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांची काळजी शेतकरी घेत आहे. पण वीजभारनियमनामुळे प्रचंड आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही भागात चार दिवस सकाळी आणि तीन दिवस रात्री वीज नसते. त्यामुळे रात्ररात्र शेतकरी वर्गाला शेतात थांबाबे लागत आहे. कान्हपूर-रमणा येथील शेतकरी तुकाराम गरड यांनी डोळ्यात आसवे आणून सर्व शेतकऱ्यांचे होत असलेले हाल ‘लोकमत’जवळ कथन केले. वीज वितरण कंपनीच्या मनमानीपणामुळे भारनियमनाचे ऐच्छिक वेळापत्रक तयार करण्यात आले की काय? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. दिवसातून धड दोन तासही सतत वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे त्रस्त झाले आहे. मोटारपंप चालू करूनही धड ओलीत होत नसल्याने हातचे पीक जावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.जमिनीतून बाहेर आलेल्या अंकुरांना पाण्याची गरज आहे. वीज कंपनीने सद्या अघोषित भारनियमन थांबवावे व शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनापासून ही बाब लपलेली नाही. परंतु लक्ष दिले जात नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन भारनियमन थांबवावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
भारनियमनाने शेतकरी वैतागले
By admin | Updated: July 2, 2014 23:24 IST