पोलीस बेपत्ता : फेरीवाल्यांनी घेतला ताबा, रस्त्याच्या मधोमध फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांची गर्दीवर्धा : येथील बाजारात फेरीवाल्यांच्या हातगाड्या चौकाच्या मधोमध रस्त्यावर उभ्या राहणे सुरू झाले आहे. या हातगाड्या कधी रस्त्याच्या कडेला उभ्या राहत होत्या. याकडे पोलिसांसह नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांच्या गाड्या आता रस्त्याच्या मधोमध उभे राहणे सुरू झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळणारे पोलीस, बाजाराच्या कारावर आर्थिक व्यवस्था सांभाळणारी पालिका व व्यापाऱ्यांच्या आपलपोटी स्वभावामुळे सध्या फेरीवाले ‘या रस्त्याचे राजे आम्हीच !’ या अविर्भावात वागत असल्याचे चित्र शनिवारी दिसत होते. शनिवारी रक्षाबंधन असल्याने बाजारात गर्दी असणार असल्याची माहिती असतानाही दुपारच्यावेळी बाजार परिसरात एकही वाहतूक पोलीस दिसून आला नाही. शिवाय नागरिकांच्या सुरक्षेकरिता कुठली पोलिसांची विशेष व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. अशात गर्दीचा लाभ उचलत समाजकंटकांकडून अनेक विघातक कृत्य केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शिवाय या सणाला बाजारात महिलांची व युवतींची गर्दी अधिक असल्याने त्यांच्या संरक्षणाकरिता बाजारात पोलीस असणे अपेक्षित होते; मात्र तसे दिसले नाही. शिवाय पालिकेच्यावतीनेही सणांच्या दिवसाकरिता फेरीवाल्यांना काही वगळे नियम दिल्याचेही दिसून आले नाही. पालिकेकडून कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.येथील कपडा लाईन, पत्रावळी चौक, दूर्गा टॉकीजच्या मार्गावरील वाहतूक पुर्णत: विस्कळीत झाल्याचे दिसले. कपडा लाईन व पत्रावळी चौकात तर रस्त्याच्या मधोमध फेरीवाल्यांच्या हातगाड्या उभ्या होत्या. पत्रावळी चौकासह बसस्थानकासमोरून धान्य बाजाराकडे येत असलेल्या रस्त्यावर दुकानमालकांनी त्यांच्या दुकानातील साहित्य बाहेर ठेवल्याने येथून वाहने कशी चालवावी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत आहे. शहर पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मार्गावर पिपरी (मेघे), येळाकेळी, सुकळी, जामणी, आकोली या मार्गाने जाणारे आॅटो उभे राहण्याकरिता जागा देण्यात आली आहे; मात्र येथे आॅटो पलटविण्याकरिताही जागा शिल्लक राहत नसल्याने सतत वाहतूक खोळंबत आहे.
बाजारातील रस्त्याचे राजे आम्हीच !
By admin | Updated: August 30, 2015 01:53 IST