दुर्लक्ष : कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने उपकरणात बिघाड चिकणी(जामणी) : येथील नागरिकांना वीज वितरणच्या अवकृपेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे नळयोजनेच्या मोटरपंपात बिघाड येऊन चार दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. येथे विजेचा दाब कमीअधिक होत असतो. त्यात वारंवार वीज खंडित होऊन पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेच्या पंप जळाला. त्यामुळे पाण्याची टाकी भरली नसून चार दिवसांपासून नळाला पाणी नव्हते. ग्रामपंचायतने त्वरीर दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत केला.(वार्ताहर) वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने ग्रामस्थ त्रस्त विरूळ (आकाजी) - वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. परिसरातील वीज पुरवठा वेळीअवेळी खंडित होतो. त्यामुळे भारनियमन नसताना ग्रामस्थांना उकाडा सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. वीज वितरण कंपनीच्या बेताल कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत असून येथील कार्यालयात कर्मचारी संख्या कमी आहे. अशात यंत्रणेत काही बिघाड झाल्यास दोन-तीन तास तो सुरळीत होत नाही. विरूळ येथील वायरमन सेवानिवृत्त झाल्यावर येथे अन्य कर्मचारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे साधारण बिघाड झाल्यावर अन्य गावातून कर्मचारी येण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागते. येथील वीज पुरवठा कधीही खंडित होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याबाबत अभियंता कळसकर यांना निवेदन सादर करण्यात आले.(वार्ताहर)
विजेच्या लपंडावाने पाणीटंचाई
By admin | Updated: April 28, 2017 02:11 IST