वर्धा : जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़ यास एक वर्षाचा कालावधी लोटला; पण नळयोजना सुरू झाली नाही़ केवळ रोहित्र न लागल्याने नळयोजना रखडल्याचे सांगितले जाते़ यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे दिसते़समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथे बोअरवेलला पाणी लागत नाही़ सतत पाण्याची टंचाई भासत असल्याने जि़प़ पाणी पुरवठा विभागांतर्गत नळयोजना प्रस्तावित करण्यात आली़ यासाठी विहिरीचे बांधकाम, विद्युत मोटर, पाईपलाईन, वीज पुरवठ्यास लागणारे साहित्य, विजेचे खांब ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ एक वर्षापूर्वी नळयोजनेचे संपूर्ण सोपस्कार पार पाडण्यात आले़ केवळ रोहित्र बसविणे शिल्लक राहिले होते़ या रोहित्रासाठी निधी नसल्याचे कारण पूढे केले जात आहे़ एक वर्षापासून काम पूर्ण होऊनही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ नळयोजना पूर्ण होऊन नळाद्वारे पाणी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत होते़ यासाठी एक वर्षापासून प्रतीक्षाही करीत आहेत; पण अद्याप ही योजना सुरूच झाली नाही़ केवळ रोहित्र नसल्याने नळयोजना रखडली आहे़ यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांना बोअरवेल कराव्या लागत आहेत़ गोविंदपूर येथील अनेक ग्रामस्थांनी आपापल्या घरी बोअरवेल केल्या; पण पाणी लागले नाही़ १०० ते १५० फुट खोल खोदूनही पाणी लागत नसल्याने नागरिकांना अकारण भुर्दंड सोसावा लागत आहे़ सुनील हिवंज यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी बोअरवेल केली़ सुमारे दीडशे फुट खोदल्यानंतरही पाणीच लागले नाही़ यामुळे त्यांना ३० ते ३५ हजार रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागला़ गावातील नळयोजना सुरू झाली असती तर ग्रामस्थांना बोअरवेलचा खर्च करावा लागला नसता़ पाणी टंचाई असताना ग्रा़पं़ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत़ विजेचे खांब, डीपी लावल्यानंतर केवळ रोहित्रासाठी वर्षभरापासून नळयोजना थंडबस्त्यात आहे़ प्रशासकीय स्तरावर यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ जि़प़ पाणी पुरवठा विभाग, ग्रा़पं़ प्रशासन व वीज कंपनीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़़(कार्यालय प्रतिनिधी)
नळयोजना रखडल्याने पाणी टंचाईचे सावट
By admin | Updated: December 1, 2014 22:59 IST