आर्थिक अडचण: दोन महिन्यांपासून वेतन थकीतआकोली : ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांना पाणी देण्याकरिता कामावर असलेल्या दाम्पत्याला फेब्रुवारी महिन्यापासून कामाची मजुरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.सेलू पंचायत समितीच्या आकोली ग्रामपंचायतने शतकोटी वृक्ष लागवड योजनेत लावलेल्या झाडांना पाणी देण्याकरिता गावातीलच मजूर कामावर आहे. बहुतांश झाडे विविध कारणाने नष्ट झाली आहे. वर्धा- माळेगाव(ठेका) रोडवरील झाडे बसस्डँड चौकातील झाडांचे दुकान व्यावसायिकांनी संगोपण केल्यामुळे ही झाडे थोडी हिरवीगार दिसत आहे. बसस्टँड पासून काही दूर अंतरावर असलेल्या झाडांना पाणी देण्याकरिता व गिरोली रोडवरील झाडांना पाणी देण्याकरिता रोजगार हमी योजनेंतर्गत एक पुरुष व पाच ते सहा महिला कामांवर आहे. यातील माधव आणि वनिता खैरकार हे दाम्पत्य कामावर असताना फेब्रुवारी महिन्यापासून त्यांना मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.रोहयोतील मजुरांना १५ दिवसांच्या आत वेतन देणे बंधनकारक असते. परंतु दोन महिने होऊनही या मजुरांना वेतन मिळालेले नाही. मस्टर मात्र नियमित भरण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अनेक ठिकाणी अशा प्रकारचा गैरप्रकार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. दिलेली कामे योग्य पद्धतीने करूनही वेतन मात्र अनियमित देण्यात येत असल्याची तक्रारे हे कुटूंब करीत आहे. तसेच आतापर्यंतचे वेतन लवकरात लवकर देण्यात यावे व होत असलेला गैरप्रकार थांबवावा अशी मागणी हे रोजगार हमी योजनेतील मजूर करीत आहे. (वार्ताहर)
मी पंचायत समितीकडे नियमित आणि वेळेतच मस्टर पाठवितो. पंचायत समितीही वेळेच्या आत बँकेकडे मजुरीची रक्कम पाठविते. पण बँक खात्यात मात्र ती रक्कम विलंबाने जमा होते.- रमेश शहारे, ग्रामसेवक, आकोली.