रोहणा : नजीकच्या दिघी-वडगाव या रस्त्यावर बांधकाम करण्यासाठी गिट्टी व मुरूम आणून टाकण्यात आली आहे; पण मागील दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली नाही. यामुळे रस्त्यावरील खड्डे वाढत आहेत. बांधकामासाठी रस्त्याच्या बाजूला टाकलेले गिट्टी, मुरुम रस्त्यावर पसरला असल्याने रहदारीही धोक्यात आली आहे. परिणामी, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या रस्त्याच्या दुरूस्ती ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. दिघी (होनाडे) ते वडगाव (पांडे) हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या बाजूला कुठे खळगे तर कुठे झुडपे वाढली आहेत. वडगाव येथील नागरिकांनी रस्ता मजबूत करण्याबाबतची मागणी केली होती. ती लक्षात घेता आर्वी बांधकाम उपविभागाने दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या बाजूला रेती, गिट्टी व मुरूमाचे ढिग आणून टाकले. यामुळे रस्ता होणार, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती; पण रस्त्याच्या बांधकामाला अद्यापही प्रत्यक्षात सुरुवात झालीच नाही. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे मोठे होत आहेत आणि आणून टाकलेली रेती, गिट्टी व मुरूम रस्त्यावर पसरला. यामुळे रस्त्यावरून दुचाकी चालविणे कठीण झाले आहे. शिवाय ग्रामस्थांना पायी चालणेही कठीण झाले आहे. आता एक महिन्याने पावसाळा सुरू होणार आहे. एकदा पावसाळा सुरू झाला की, रस्त्याचे बांधकाम करता येणे शक्य नाही. पावसाळ्यात हा रस्ता असाच राहिला तर भविष्यात किती अपघात होणार, या विचाराने वडगाव येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत दिघी ते वडगाव रस्त्याच्या दुरूस्तीचे काम त्वरित सुरू करावे, अशी वडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमाकांत पांडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)
दिघी-वडगाव रस्त्याच्या दुरूस्तीची ग्रामस्थांना प्रतीक्षा
By admin | Updated: May 17, 2014 00:25 IST