कार्यवाही शून्य : स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षवायगाव (नि.) : वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा या भागातील एका धनिक शेतकऱ्याने एक ते दीड वर्षापूर्वी तोडला; पण लोकप्रतिनिधींनी त्या धनाढ्य शेतकऱ्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. शिवाय त्या बंधाऱ्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. संबंधित अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तुटलेल्या बंधाऱ्याला दीड वर्षांपासून दुरूस्तीची प्रतीक्षा कायम आहे.बंधारा तोडल्या प्रकरणी त्या धनिक शेतकऱ्यावर कार्यवाही का केली नाही, हे एक कोडेच आहे. सदर शेतकऱ्याने एक-दोन वर्षांपूर्वीच शेत विकत घेतल्याची चर्चा आहे. या बंधाऱ्यामुळे त्याच्या शेतात पाणी जाण्याची भीती असल्याने त्याने तो तोडल्याची माहिती आहे. बंधारा तुटल्याने येथील शेतकऱ्यांच्या ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. गत एक ते दीड वर्षापासून कुठलीही कार्यवाही न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.वायगाव ते सोनेगाव मार्गावरील भदाडी नदीवर भूजल विभागाने २००५-०६ च्या सुमारास सिमेंटचा पक्का बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे ग्रा.पं. नळयोजनेच्या विहिरीला पाणी वाढले होते. सोबतच शेतातील विहिरीची पातळी वाढण्यास मदत झाली होती. या भागातील शेतकऱ्यांना ओलिताचीही सोय झाली होती. हा बंधारा बांधल्यानंतर तो ग्रा.पं. कडे हस्तांतरीत करण्यात आला. शासन पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवारावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे; पण एक शेतकरी कुठलीही परवानगी न घेता बंधारा फोडतो, त्याच्यावर एक-दीड वर्षे होऊनही कार्यवाही होत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच घटनास्थळावर अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी पोहोचले होते; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. साधी डागडुजीही करण्यात आली नाही. वायगाव येथील ग्रामपंचायतीसह सर्व लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे आहेत. याच पक्षामार्फत जलयुक्त शिवार योजना जोमाने सुरू आहे; पण तोडलेला बंधारा दुरूस्त केला जात नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. हा बंधारा दुरूस्त करावा, अशी मागणी अनेकदा येथील शेतकऱ्यांनी वायगाव ग्रा.पं. कडे केली; पण तो बंधारा ग्रा.पं. कडे नसल्याचेच सांगितले जात आहे. भूजल विभागाला विचारणा केली असता ग्रा.पं. ला हस्तांतरीत केल्याचे सांगण्यात येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
तोडलेला बंधारा दीड वर्र्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: June 10, 2016 02:17 IST