२० दिवसांपासून पावसाची दडी : पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावरआर्वी : दोन आठवड्यापासून सुट्टीवर गेलेल्या पावसाची फुलोऱ्यावर असलेल्या सोयाबीनला प्रतीक्षा आहे. फुलोऱ्यावर जर पावसाची सर कोसळली तर शेंगा भरण्यास अधिकच पोषक वातावरण तयार होते. उडीद, मूग, तुरीचे पीक जोमात आहे. तालुक्यात तुरीचे पीक काही प्रमाणात जळाले आहे. दरम्यान, ‘अॅक्यू वेदर’ या संकेतस्थळाच्या अंदाजानुसार काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवस पुन्हा कोरडे राहणार असल्याचे नमूद आहे. सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाल्याने सध्या सोयाबीनचे पीक जोमात आहे. यावर्षी सोयाबीनची पेरणी अधिक आहे. सध्या सोयाबीन फुलोऱ्यावर आहे. काही ठिकाणी शेंगांचे चलपेही तयार झाले आहे. अशा स्थितीत पावसाच्या सरी जर फुलोऱ्यावर पडल्या तर शेंगा भरण्यास मोठी मदत होते. यामुळे जळगाव, वर्धमनेरी, बेल्होरा, खानवाडी, खुबगाव, धनोडी, रोहणा, देऊरवाडा, नांदपूर, शिरपूर व तालुक्यातील अन्य गावांतील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. दोन आठवड्यापासून विश्रांती घेतलेला पाऊस येत्या काही दिवसांत हजेरी लावण्याची शक्यता आहे. खरीपातील कडधान्यातील महत्त्वाचे पीक असलेले उडीद, तूर समाधानकारक आहे तर मुंग तोडणीच्या अवस्थेत आहे. पाऊस बेपत्ता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्याप्त आहे. आणखी काही दिवस पावसाचे आगमन न झाल्यास शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला मुकावे लागणार, असे चित्र आहे.(तालुका प्रतिनिधी)उन्हामुळे जमिनीला पडताहेत भेगाजुलै महिन्यात समाधानकारक आलेला पाऊस गत १५ ते २० दिवसांपासून बेपत्ता आहे. शिवाय उन्ह तापत असल्याने जमिनीला भेगा पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची डवरणी, निंदणाची कामेही वेगाने होत नसल्याचे दिसून येत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर, ड्रीपच्या साह्याने पिकांना ओलित सुरू केले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतातील पिकेही चांगली असली तरी पाऊस न आल्यास हातची जाऊ शकतात.
खरीपातील पिकांना पावसाची प्रतीक्षा
By admin | Updated: August 26, 2016 02:03 IST