नाचणगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नाचणगावचा उल्लेख होतो़ जवळपास ३० हजार लोकसंख्येच्या या गावालगत ताडोबा व देव, असे दोन तलाव आहेत़ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण या तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास गावाच्या विकासास चालना मिळू शकते; पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत गावाच्या मधोमध असलेल्या या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे़ गावातील ताडोबा तलाव भूमापन क्रमांक ३८७/१ क्षेत्र २.६२ हे.आर. तर देव तलाव भूमापन क्रमांक ३९७ क्षेत्र १०.३० हे.आर. इतके आहे. दोन्ही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे़ यामुळे पाण्याची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे़ या तलावाच्या खोलीकरणासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली; पण अद्यापही प्रशासनाने लक्ष दिलेले नाही़ शिवाय ग्रामपंचायतीनेही या दृष्टीने उपाययोजना केल्या नाही़ दोन्ही तलावातील गाळ काढून खोलीकरण केले तर मुबलक जलसाठा होऊ शकतो़ शिवाय पाण्याचा कायम स्त्रोत्र निर्माण होऊन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते़ याकडे लक्ष देण गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)
ऐतिहासिक तलावाच्या खोलीकरणाची प्रतीक्षा कायमच
By admin | Updated: February 7, 2015 23:29 IST