समस्येचे निराकरण करण्यास पालिकेची टाळाटाळहिंगणघाट : येथील नेताजी वॉर्ड आणि टिळक वॉर्ड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गत चार महिन्यांपासून ठप्प आहे. यामुळे येथील रहिवाश्यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागते. पालिका प्रशासनाकडे या समस्येची तक्रार देण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे. अखेर त्रस्त रहिवाश्यांनी न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत वृत्त असे की, येथील टिळक वॉर्ड आणि नेताजी वॉर्ड परिसरातील नळधारकांना अनियमीत पाणीपुरवठा होतो. यामुळे येथील नागरिक त्रस्त आहे. चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागते. चार महिन्यांपासून या समस्येची पालिका प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. शिवाय पाणीपुरवठा ठप्प होण्याचे कोणतेही कारण सांगण्यात येत नाही. नागरिकांनी वेळोवेळी पालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला, तक्रार दिली. मात्र समस्या निकाली निघाली नाही. त्यामुळे येथील त्रस्त नागरिकांनी न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आठ दिवसात समस्या निकाली काढण्याची मागणी केली. अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सुरेश बोकडे, अनिल मारशेट्टीवार, हरी लुडीले, वंदना मारशेट्टीवार, चंद्रकला मारशेट्टीवार, गोपाळ कुंभारे, छाया पराते, तुषार हवाईकर आदी नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
पिण्याच्या पाण्यासाठी चार महिन्यांपासून प्रतीक्षा
By admin | Updated: November 18, 2015 02:15 IST