हिंगणघाट : शिधापत्रिका धारकांना अनियमित होणारा धान्य पुरवठा हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा गलथान कारभाराचा फटका लाभार्थ्यांना सहन करावा लागत असून याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. वेळेवर धान्य न मिळणे, अन्न पुरवठा न होणे आदी समस्यांचा सतत सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय रिमडोह येथील लाभार्थ्यांना येत आहेत. फेब्रुवारी महिन्यातील धान्य वाटप झाले नसल्याने याबाबत हिंगणघाट येथील तहसीलदाराकडे तक्रार करण्यात आली.हिंगणघाट तालुक्यातील रिमडोह येथील शिधा पत्रिकाधारकांना फेब्रुवारी महिण्यातील धान्याचा पुरवठा केला नाही. प्रत्यक्षात धान्य दुकान मालकाने लाभार्थ्यांच्या धान्याची उचल केली असल्याची माहिती आहे. मात्र लाभार्थ्यांपर्यंत हे धान्य पोहचले नाही. उचल केलेल्या धान्याचे काय झाले, याची चौकशी केली जावी. तसेच लाभार्थ्यांना धानाचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. तहसीलदार यांना निवेदन देताना विनोद उईके, विठ्ठल भूते, गंगाधर मेश्राम, विठ्ठल गेडाम, प्रितम कुमरे, किशोर गहूकर, मनीषा गेडाम, चंद्रकला कोरझरे, प्रकाश पाटील, शोभा रामपूरे, जयश्री भोमले, अंकूश मेश्राम आदी लाभार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
लाभार्थ्यांना धान्य वाटपाची प्रतीक्षा
By admin | Updated: March 6, 2015 01:59 IST