अनामत रक्कमही भरली : शेतकऱ्यांना ओलिताची अडचण; डिसेंबरपर्यंत पंप मिळण्याची शक्यतारुपेश खैरी वर्धा गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अशात अनेकांच्या शेतात पाणी असताना कृषी पंपाला वीज जोडणी नसल्याने ओलीत करणे अवघड जात आहे. असे एकूण ३ हजार ७१५ शेतकरी महावितरणकडे अर्ज करून कृषी पंपाकरिता वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरडवाहू आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. यामुळे जिल्ह्यात सिंचनाची सुविधा व्हावी याकरिता शासनाच्यावतीने धडक सिंचन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कृषी पंपाचकरिता वीज जोडणी देण्याची योजनाही राबविण्यात आली. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहितही करण्यात आले; मात्र त्यांच्या मागणीनंतरही त्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. शेतकऱ्यांची कृषी पंपाची मागणी पाहता जुलै अखेरपर्यंत ४ हजार ५८० कृषी पंपांना जोडणी देण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असतानाही अजून ३ हजार ७१५ शेतकऱ्यांचे अर्ज जोडणीकरिता प्रतीक्षेत असल्याचेच दिसून आले आहे. या शेतकऱ्यांनी आवश्यक अश्वशक्तीच्या नियमानुसार महावितरणकडे अनामत रक्कमही भरली आहे; मात्र त्यांना अद्याप पंप मिळाले नाही. यामागची कारणे विचारली असता शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याकरिता आवश्यक असलेला रस्ता नाही, विद्यूत खांब नाही, यामुळे जोडणी देणे कठीण जात असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात येत आहे.
३,७१५ शेतकऱ्यांना कृषीपंप जोडणीची प्रतीक्षा
By admin | Updated: August 24, 2016 00:29 IST