गुन्हा दाखल : कर्मचाऱ्यांनी पाहिला प्रकार आष्टी (शहीद) : देलवाडी येथील मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेले मतदार अधिकारी अजय देशमुख यांनी तहसीलदारांच्या कक्षात मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना शनिवारी उजेडात आली. येथील हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाचे शिक्षक अजय देशमुख यांची देलवाडी मतदार केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून ड्युटी लागली होती. नियुक्ती झालेल्या केंद्रावर जाण्यासाठी निवडणुकीसाठी लागणारे साहित्य ताब्यात घेण्याकरिता देशमुख तहसीलदार कार्यालयात गेले. यथेच्छ मद्यप्राशन करून ते थेट तहसीलदार सीमा गजभिये यांच्या कक्षात शिरले. जोरात आरडाओरड करून त्यांनी तहसीलदारांशी वाद घातला. मतदार अधिकारी झिंगत असल्याचे पाहून नायब तहसीलदार एस. एस. थोरात यांनी समजूत काढली; मात्र देशमुख कुणाचेही ऐकून घ्यायला तयार नव्हते. शासकीय कार्यालयात मद्यप्राशन करून राडा केल्याप्रकरणी लागलीच पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. ठाणेदार दिलीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक राजू दहिलेकर यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून शिक्षक अजय देशमुख यांच्यावर कलम ८५ (१) मुंबई दारूबंदी कायदा सहकलम १८६ व सहकलम ११०, ११७ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तहसीलदाराच्या कक्षात झालेला हा प्रकार सर्वच कर्मचाऱ्यांनी पाहिला. अजय देशमुख नेहमी मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांना शिकवितात. याआधी त्यांचा दारूच्या नशेत गाडी चालविल्याने अपघात झाला आहे. तरीदेखील त्यांचा प्रताप काही थांबला नाही. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाने या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांनी केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक तालुक्यात शांततेत पार पडली. केवळ एका प्रकरणामुळे कार्यालयात अस्वस्थता पसरली होती. या शिक्षकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
तहसीलदारांच्या कक्षात मद्यधुंद मतदान अधिकाऱ्याचा धिंगाणा
By admin | Updated: February 19, 2017 01:41 IST