फनिंद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : विद्युत वितरण कंपनीने भरपावसाळ्यात एकही दिवस कृषिपंप लावला नसतानाही शेकडो युनिट वापरल्याचा कांगावा करीत हजारोंचे देयक आकारले. पावसाळ्यात सतत पाऊस पडल्याने एकही दिवस पिकाला पाणी देण्याची गरज पडली नाही. केवळ फवारणीकरिता पाणी काढण्यासाठीच कृषिपंप लावावा लागला. असे असतानाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टेबलवर बसून उन्हाळ्यात जेवढा वापर होतो तेवढे देयक थोपवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. प्रत्यक्ष रीडिंग घेऊन देयक आकारण्याची अनेक दिवसांपासून मागणी असतानाही कंपनी आपल्या धोरणात बदल न करता शेतकऱ्यांनी देयक थकविल्याचा उलट्या बोंबा मारतात. कोणतेही रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना कृषिपंपाचे भरमसाठ देयक आकारुन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. थकबाकी असल्याचे कारण पुढे करुन शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. विद्युत कंपनीने वापरलेल्या युनिटचे देयक आकारले तर शेतकरीही नियमितपणे देयकाचा भरणा करतो. परंतु कंपनीकडून धोरणात सुधारणा न करता शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार चालविल्याची ओरड शेतकरी करीत आहे. असंख्य शेतकऱ्यांना दंड, व्याज व इतर आकार धरून ५० हजार रुपयांच्यावर देयक आल्याचे सांगितले जात आहे. अतिपावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले असून लावलेला खर्चही भरून निघण्याची शक्यता नाही. अशातच देयकाच्या वसुलीची सक्ती केली जात आहे. यातून विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होत आहे. विद्युत देयकाच्या थकबाकीसाठी शेतकरी जबाबदार नसून कंपनीचे ‘हम करे सो कायदा’ हे धोरण जबाबदार असल्याचे शेतकरी ठामपणे सांगत आहेत.
नागरिकांची मोठी संख्या असताना घरगुती देयक रीडिंगप्रमाणे दिल्या जातात. तर तुलनेने कृषिपंपधारकांची संख्या कमी असतानाही प्रत्यक्ष रीडिंग न घेता कार्यालयात बसूनच देयक आकारले जाते. ही बाब शेतकऱ्यांकरिता आर्थिक कोंडी करणारी आणि देशोधडीला लावणारी आहे. यात विद्युत वितरण कंपनीने सुधारणा करण्याची गरज आहे. दिलीप पांडे, शेतकरी,दिघी