विजय माहुरे -घोराडमहाराष्ट्रात १२ व्या शतकात संत चळवळीला सुरूवात झाली. १२ व्या शतकापासून संत ज्ञानेश्वराने भक्ती मार्गातून अध्यात्म व समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. ते १६ व्या शतकापर्यंत तुकाराम महाराजांनी पूर्णत्वास नेल्याचे म्हटले जाते. संत कृपा झाली। इमारत फळा आली।ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।जनार्दन एकनाथ । ध्वज उभारला भागवत।भजन करा सावकाश । तुका झालासे कळस। या भक्ती मार्गाचा वारसा महाराष्ट्रातील अनेक संतांनी पुढे नेला. त्यास विदर्भातील १८२ वर्षापूर्वी उदयास आलेले अलौकिक पिता-पुत्र संत केजाजी व संत नामदेव महाराज होय.संत केजाजी महाराजांचे कुटुंब चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती म्हणजे भांदकचे. महाराजांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील बेला या गावी १९४३ साली झाला; पण त्यांचे कुटुंब त्यांच्या बालपणीच घोराड येथे स्थायिक झाले. त्यांच्या पावन स्पर्शाने घोराड नगरी विदर्भातील पंढरी म्हणून ओळखली जाते.संत केजाजी महाराजांचे वडील सखाबुवा, आई चंपाबाई भादंककर अतिशय गरिबीमध्ये जीवन व्यतित करीत होते. अठराविश्वे दारिद्र्यामुळे गावातील वासुदेव पाटलाकडे शेतावर ते चाकरी करीत होते. बालपणी महाराजांना ‘केज्या’ म्हणत असे. बालपणापासूनच केजाजी अध्यात्मिक वृत्तीचे होते. ते सदैव विठ्ठल नामाचा जप करीत परमेश्वर भक्तीत तल्लीन असायचे. एकदा पाटलाकडे केजाजी काम करीत असताना सर्व नोकरांना काट्याचा फास रचण्यास सांगितला. सर्व नोकर फास रचण्यात गुंतले असताना केजाजी मात्र हरिनामात गुंग होते. इतरांचे काम पूर्ण होत असताना केजूने काम केले नाही म्हणून मालक रागवेल, असे महाराजांना नोकरांनी सांगताच महाराज हरिनामाचा जप करीत अनवानी पायाने काट्यांच्या फासावर चढून फास रचू लागले. इतर सर्व नोकरांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. ही चर्चा गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरली.गावातील सर्वांनी हा प्रकार बघितला. तेव्हापासून केजाजी महाराजांचे संत स्वरूप लोकांना कळले. त्यानंतर त्यांना कधीही कुणी काम सांगितले नाही, तरी नियमित मजुरी व धान्य त्यांना दिले जात होते. केजाजी महाराजांची हळूहळू प्रसिद्धी होत गेल्याने राजे रघुजी भोसले महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा राजाने द्वारकेला जाण्यासाठी केजाजींना सोबत घेतले. महाराज पहाटे उठून नित्य प्रदक्षिणा करीत असताना रघुजी राजे द्वारकाधिशांचा अभिषेक करीत होते. केजाजी महाराज फक्त धोतर घालायचे. तेच अंगावर पांघरायचे. हा कुणी वेडा असे या अविर्भावाने द्वारकापालांनी त्यांना मंदिरात प्रवेश दिला नाही.अभिषेक सुरू असताना ब्राह्मण मंत्रोपचार करीत होते. श्लोकाच्या विशिष्ठ ठिकाणी महाराज हरि हरि विठ्ठल विठ्ठल मोठ्याने म्हणायचे; पण त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही; मात्र ब्राह्मणांना श्लोक म्हणताना अवघड वाटत होते. त्याच रात्री द्वारकाधीश कृष्णरूपात ब्राह्मणांच्या स्वप्नात गेले व रघुजी राजांच्या ताट्यातील धोतर घातलेल्या विशिष्ट व्यक्तींच्या उपस्थितीत अभिषेक करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अशा व्यक्तीचा शोध घेतला असता ते धोतर घातलेले केजाजी महाराज होते. रघुजी राजाचा केजाजी महाराजांकडून अभिषेक करण्यात आला. महाराजांनी ब्राह्मणांची चुक लक्षात आणून दिली.केजाजींनी चुकलेले श्लोक म्हणून दाखविले. तेव्हापासून राजे रघुजी भोसले हे महाराजांचे निस्सीम भक्त झाले. केजाजी महाराज ज्ञानी होते, हे सिद्ध झाले.संत केजाजी महाराज व संत गजानन महाराज समकालीन संत होते. हिंगणी या गावी भक्ताच्या भेटीला जात असताना संत गजानन महाराजांनी श्री क्षेत्र घोराडला भेट दिली, असे गं्रथात नमूद आहे. अशा महान कर्मयोगी संताला आपल्या अंतिम वेळेची जाणीव होती. आता हे मडके फुटणार, असे ते भक्तांना सांगत होते; पण त्यांचा भावार्थ कुणालाही कळला नाही. १९०७ मध्ये ते आपले पुत्र संत नामदेव महाराज व काही भक्तांना घेऊन प्रयाग (अलाहाबाद) येथे गेले आणि तेथेच आपली शेवटची वारी करीत १४ जानेवारी १९०७ पौष वद्य पक्ष १० रोजी मकरसंक्रातीला त्यांनी आपला देह ठेवला. प्रयाग येथे केजाजी महाराजांची समाधी आहे. घोराड येथे त्यांच्या यात्रेत बोरतिर्थ परिसर भक्तांनी दरवर्षी फुलून गेलेला असतो.
विदर्भाच्या संत परंपरेतील अलौकिक संत ‘केजाजी’
By admin | Updated: January 20, 2015 22:41 IST