अनेक मागण्या प्रलंबित : जाचक अटींनी शिक्षक त्रस्तवर्धा : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व अपंग विद्यार्थ्यांच्या शाळा शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक समस्या मागण्या प्रलंबित आहेत. सदर समस्या निवारणार्थ शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाद्वारे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, संघटनेचे जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार सहभागी झाले होते. २८ आॅगस्ट २०१५ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करणे, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या परिपत्रकामध्ये सुधारणा करावी, १२ व २४ वर्षे सेवा झाल्याची अट रद्द करून त्याऐवजी ८ व २० वर्षाची सेवा झालेल्या शिक्षकांना सदर प्रशिक्षणासाठी पात्र ठरवावे अशी संघटनेची मागणी आहे. नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करून सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, कायम विना अनुदान तत्वावर दिलेल्या खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या अनुदानासाठी पात्र ठरविणे, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १ जुलै २०१५ पासुन देय असलेला ६ टक्के महागाई भत्ता मंजूर करणे, १ जानेवारी २०१५ ते ३० सप्टेंबर २०१५ या ९ महिन्याची थकबाकी फेब्रुवारी २०१६ च्या वेतनासोबत अदा करावी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यासोबत झालेल्या २१ जानेवारी २०१६ च्या सहविचार सभेतील निर्णयाप्रमाणे निर्णयाच्या प्रती देण्यात याव्या आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. २१ जानेवारी २०१६ च्या सहविचार सभेतील मान्य केलेल्या निर्णयाच्या प्रती न दिल्यास आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग भालशंकर यांनी सांगितले. आंदोलनात शशांक हुलके, जयप्रकाश थोटे, शशिकांत वैद्य, धर्मपाल मानकर, अनिल पोटदुखे, शिला पंचारिया, श्याम चित्रकार, सुनील दुम्पलवार, अशोक घारे, सुरेशकुमार बरे, गोपाल खंडागळे, प्रमोद खोडे, इंद्रजित ढोल, संजय घोडमारे, नरेंद्र हुलके, किशोर सोनटक्के, रवींद्र वाघमारे, सुहास गवते, संदीप चोरे, आशिष पोहाणे, संभा घाटुर्ले, विलास येंडे सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे
By admin | Updated: February 9, 2016 01:48 IST