वर्धा : जनमंच संघटनेतर्फे वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्याकरिता सिंदखेडराजा येथून विदर्भ मुक्ती यात्रा निघाली. अमरावती येथील कार्यक्रम करून ही यात्रा तळेगाव, कारंजा (घाडगे) येथून शनिवारी नागपूरकरिता रवाना झाली. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची सुरूवात झाली आहे. या यात्रेचा समारोप नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणार आहे. स्वतंत्र विदर्भाचा लढा हा जनतेचा असल्यामुळे या यात्रेचे नेतृत्व कोणत्याही एका व्यक्तीकडे नाही. यात्रेत असणाऱ्या रथावर राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा आहेत. ही मुक्ती यात्रा २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंदखेडराजा येथून निघाली. चिखली, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर मार्गे सायंकाळी अमरावती येथे ती पोचणार आहे. अमरावती येथे मुक्काम करून २१ सप्टेंबर रोजी मोझरी, तळेगाव, कारंजा, कोंढाळी, गोंडखैरी, वाडी, व्हेरायची चौक, रहाटे कॉलनी या मार्गे सायंकाळी ५.३० वाजता दीक्षाभूमी येथे पोहोचेल. दीक्षाभूमी येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात जनमंचचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विदर्भ वाद्यांची उपस्थिती राहणार आहे. (प्रतिनिधी)
विदर्भ मुक्ती यात्रा तळेगाव, कारंजा येथून रवाना
By admin | Updated: September 21, 2014 23:55 IST