तिकिटांच्या रकमेची अफरातफर : तडजोडीतून निपटारा करण्याचे आदेश वर्धा : राज्य परिवहन महामंडळात वाहकांकडून तिकिटाच्या रकमेत अपहाराची अनेक प्रकरणे आहेत. असे प्रकार वाढत असल्याने अशा वाहकांवर प्रचलीत नियमानुसार कार्यवाही करण्यास विलंब होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने तडजोड पद्धत अंमलात आणली आहे. या पद्धतीत वाहकाने केलेल्या अफरातफरीला पाचशे, साडेसातशे व एक हजार पटीने दंड आकारला जात आहे. याच पद्धतीतून वर्धेतील एका वाहकाला तब्बल १२ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तिकिटाच्या अपहार प्रकरणात जिल्ह्यात २७३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या प्रकरणाची चौकशी करून त्या निकाली काढण्याच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. हा निर्णय संपूर्ण राज्याकरिता असून त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. तडजोड करताना मंडळाच्यावतीने अनेक नियम दिले आहेत. वाहकाची अपहार करण्याची पहिली वेळ असेल तर त्याने अपहार केलेल्या रकमेला ५०० रुपयांनी गुणायचे म्हणजेच पाचशेपट दंडाची रक्कम होईल. ही रक्कम त्या वाहकाकडून वसूल करण्यात येणार आहे. वाहकाने जर हा प्रकार दोन वेळा केला असल्यास अपहाराच्या रकमेला ७५० आणि तीन वेळा केला असेल तर त्याला एक हजार रुपयांनी गुणाकार करून तेवढी रक्कम दंड म्हणून देण्यात येणार आहे. असाच दंड वर्धेतील गंगासागर लांजेवार या वाहकाला ठोठावण्यात आला आहे. लांजेवार यांच्यावर दोन वेळा अपहार केल्याची नोंद विभागात आहे. यामुळे त्यांनी केलेल्या अपहारावर साडेसातशे पट दंड आकारण्यात आला आहे. एवढी रक्कम कशी भरावी असा प्रश्न आता लांजेवार यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ही पद्धत कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड देणारी असून जुनीच पद्धत बरी असल्याचे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.(प्रतिनिधी) वाढती प्रकरणे मार्गी काढण्याकरिता वरिष्ठांकडून या सूचना आल्या आहेत. त्या सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. वाहकांनी केलेल्या अपहाराच्या संख्येनुसार दंड देण्यात येणार आहे. वर्धेत अशा प्रकाराची पत्र पाठविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यात जे होकार दर्शवतील त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. दंड अमान्य करतील त्यांच्यावर प्रचलीत पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल.- राजीव घाटोळे, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, वर्धा.वाहकाने होकार दिल्यास तडजोडतडजोड पद्धत एक मार्गी नसून ती द्विमार्गीय आहे. यात जर अपहार करणाऱ्या वाहकाने तडजोड करण्यास होकार दिला तरच ती होऊ शकते. जर या प्रकाराला त्याने नकार दिला तर कुठलीही तडजोड होणे शक्य नाही. त्याने या पद्धतीला नकार दिला तर त्याच्यावर प्रचलीत पद्धतीने कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे ही पद्धत यशस्वी होण्याकरिता तडजोडीची रक्कम भरण्याकरिता वाहक तयार असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात २७३ प्रकरणे तिकिटींच्या अपहाराची वर्धेत तब्बल २७३ प्रकरणे चौकशीत आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करणे कठीण होणार आहे. हीच अवस्था राज्याची आहे. यामुळे तडजोड पद्धत अंमलात आणण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या पद्धतीतून वर्धेतील वाहकांना पत्र पाठण्यिाचे काम सुरू झाले आहे.
वाहकाला १२,७५० रुपयांचा दंड
By admin | Updated: September 19, 2016 00:43 IST