वर्धा : मेथी व पालक या भाज्यांची आवक मंदावल्याने भावात तेजी आली आहे. वर्धेत येणारी शिमला मिरची ही मुख्यत: नाशिक परिसरातून येते. सोबतच अहमदनगर व अकोला येथूनही शिमला मिरचीची आवक होते. सध्या या मिरचीचे भाव ६० रुपये प्रतीकिलोवर असल्याचे बजाज चौकातील मुख्य भाजीबाजार व गोलबाजार येथे फेरफटका मारला असता दिसून आले़सध्या शाळा सुरू झाल्या आहेत़ मुलांना डबा द्यावा लागतो़ यासाठी महिलांना दररोज वेगवेगळ्या भाज्या आवश्यक असतात़ भेंडी, कोबी, बटाटे या मुलांच्या आवडत्या भाज्या आहेत; पण भाव वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट पार कोलमडले आहे. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाला पिके संकटात सापडली आहे़ यामुळे या भाज्यांची आवक बाजारपेठेत कमी झाली आहे. भाववाढीच्या नावाखाली किरकोळ दरावर विक्री करणाऱ्यांकडून अधिकचे पैसे घेतल्याने भाजी महाग होत आहे. या किरकोळ व्यापाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे वाटेल त्या भावाने भाजीची विक्री होत असून ग्राहकांची फसवणूक होत आहे. भाजीपाला चांगलाच महागला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पाऊस न झाल्यास हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जून संपला तरी पावसाचा पत्ता नाही. पिकांना देण्यासाठी पाणी नाही व पाऊस नाही. यामुळे नवीन लागवड झाली नाही. परिणामी, आवक मंदावली आहे़ मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते. दर इतके घसरले की, भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती; पण सध्या बाजारात भाजीपाला येत नाही. दहा शेतकऱ्यांकडून हा माल गोळा करावा लागतो. इतर शहरातून भाजीपाला आणल्यास त्याचे दर अधिक असतात. यामुळे तेही परवडत नाही. शहरातील भाजीबाजारामध्ये शेतकरी सकाळी भाजीपाला विक्रीसाठी आणतात़ व्यापाऱ्यांकडून लिलाव केला जातो़ यात भाजीपाल्याचे भाव आणखी वाढत असल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)
पावसाअभावी भाज्या कडाडल्या
By admin | Updated: July 1, 2014 01:39 IST