वर्धा : रूपेश मुडे मृत्यूप्रकरणी वडार समाज आक्रमक झाला आहे. समाजाच्या राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने वर्धेत दाखल होऊन बुधवारी मृतक वास्तव्यास असलेल्या वडार वस्तीत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी वर्धेतील विविध संघटनांचे प्रतिनिधी देखील आवर्जून उपस्थित होते. बैठकीनंतर एका शिष्टमंडळामार्फत मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी केली. तसेच समस्त हिंदू आघाडीच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता बळावली आहे.वडार समाज अद्याप समाजाच्या मुख्य प्रवाहात आला नाही. समाजातील बहुतांश लोक अशिक्षित आहे. रूपेश हा चवथ्या वर्गात शिकत होता. ही बाब समाजासाठी गौरवाची होती. ८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता तो घरी परत आला. वडार वस्तीमध्ये दुपारी खेळत होता. यानंतर मात्र तो घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा पत्ता लागला नाही म्हणून त्याच्या आईने पोलिसात तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी विकास विद्यालयाच्या मागील भागात मृतदेहच आढळला. मृतदेहाचे डोळे आणि किडण्या काढून नेल्याची बाब पुढे आली. हे प्रकरण कुठलाही अपघात नसून विशिष्ट उद्देशाने या कोवळ्या मुलाची हत्या करण्यात आली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रकरणी सीबीआय चौकशी करून रुपेशच्या आई-वडिलांना न्याय मिळवून देण्यात यावा, रूपेशच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणीही लावून धरण्यात आली. शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष कैलास पवार, यवतमाळ जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश चव्हाण, वर्धेचे महेश मंजुळकर, पुसदचे महादेव गायकवाड, बाबुराव श्रीहरी, दिग्रसचे उत्तम देवगण, बंजारा क्रांती दलाचे विजय राठोड, मनोहर गायकवाड, प्रशांत हराळे, नरेश पिटेकर, अनिल पिटेकर यांचा समावेश होता. समस्त हिंदू आघाडीतर्फे राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मराठवाडी संघटक संतोष उर्फ उदयनराजे देवकर यांनी दिला आहे. वर्धेतील नुतन माळवी, शारदा झामरे, भास्कर भगत, अशोक देशमुख, गजेंद्र सुरकार, मनोहर पंचेरीया, अविनाश काकडे, सुधीर पांगुळ व अन्य मंडळी उपस्थित होती.(जिल्हा प्रतिनिधी)
वडार समाजाचे शिष्टमंडळ वर्धेत
By admin | Updated: November 12, 2014 22:48 IST