महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांकडून कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नमविण्यासाठी लसीकरण हा खबरदारीचा प्रभावी उपाय असल्याने जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. त्याला वर्धेकरांचाही स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चार दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात आला. या चार दिवसांत तब्बल ४५ हजार ६५१ व्यक्तींनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतल्याने जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ५.४७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
आठवड्यात या दिवशी राबविली मोहीमशासनाकडून लसकोंडी केल्या जात असलेल्या वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३,४,६ आणि ७ ऑगस्टला व्हॅक्सिनेशन माेहिमेला गती देण्यात आली. याच चार दिवसांत ३१ हजार १८४ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १४ हजार ४६७ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
गरोदरसह स्तनदा महिलांना घेत आहेत व्हॅक्सिनसुरुवातीला कोविडची लस गरोदर तसेच स्तनदा महिलांना देण्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले नव्हते. तर आता शासनाकडून सूचना प्राप्त झाल्याने तसेच गरोदर तसेच स्तनदा महिलांसाठीही ही लस सुरक्षित असल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात स्तनदा व गरोदर महिलांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. अनेक स्तनदा तसेच गरोदर महिला नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेत आहे.
जिल्ह्यात लससाठा उपलब्ध होताच लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. आतापर्यंत लसीचे ५ लाख ४७ हजार ४८१ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. यात लसीचा पहिला डोस घेणारे ४ लाख १३ हजार १९९ तर दुसरा डोस घेणारे १ लाख ३४ हजार २२० लाभार्थी आहेत. जिल्ह्यात लसीचा वेस्ट नाहीच.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
जंगलव्याप्त भागातही लसीकरणाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद
लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. विशेष म्हणजे शहरी परिसराच्या खांद्याला खांदा लावूनच जिल्ह्यातील ग्रामीण आणि जंगलव्याप्त तसेच डोंगराळ भागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रांवर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.