समीर कुणावार : राष्ट्रीय गळीतधान्य, तेलताड व अन्न सुरक्षा अभियानवर्धा : शेतकऱ्यांनी आधुनिक सिंचन, पीक पद्धतीचा अवलंब करुन आर्थिक समृद्ध व्हावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुजलाम, सुफलाम शेती करावी. शासनांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे, याबाबत काही अडचणी असल्यास थेट संपर्काचे आवाहन आ. समीर कुणावार यांनी केले.हिंगणघाट येथील केजीएन सभागृहात शुक्रवारी राष्ट्रीय गळीतधान्य, तेलताड व अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. दीपप्रज्वलनाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती वसंत आंबटकर, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजय तपासे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, कृषी तज्ज्ञ अभय भंडारी, नागपूरच्या पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे संचालक डॉ. नंदकिशोर झाडे, उमाकांत वरडकर, संगीता अरजपुरे, प्राध्यापक डॉ. सारीपुत लांडगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय गळीत धान्य, तेलताड व अन्न सुरक्षा अभियानहिंगणघाट : येथील केजीएन सभागृहात शुक्रवारी राष्ट्रीय गळीतधान्य, तेलताड व अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रमात आ. कुणावार म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य नियोजन करावे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग करून देशी पिकांचे संवर्धन आणि जल उत्पादकता वाढवून शाश्वत पिण्याचे स्त्रोत बळकट करावेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसिंचन करावे. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगून पाणी बचतीचा संदेश दिला. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बदलणारे जग या विषयावर विस्तृत स्वरुपात अभय भंडारी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पीक, पिकांचे उत्पादन, उत्पादकता, बाजारपेठ या विषयावर मार्गदर्शन केले. आधुनिकतेची कास धरुन ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. राजस्थानपेक्षा आपल्या भागात पावसाचे प्रमाण अधिक असूनही आपणाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईला हद्दपार करावयाचे असेल तर प्रत्येक वाहणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन पाणी जमिनीत मुरविले पाहिजे, असे सांगून जलस्वावलंबनाचा प्रत्येकाने ध्यास घ्यावा व त्यादृष्टीने कार्य करावे. पारंपरिक पीक पद्धती बदलून आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. जलस्वावलंबन, वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग अधिक महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले. प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. डॉ. सारीपुत लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी मागेल त्याला शेततळे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय कृषी व्यवस्था चिंंता व चिंंतन या विषयावरही अभय भंडारी यांनी विचार मांडले. तसेच संगीता अरजपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे महात्मा गांधी यांचे पुस्तक आणि दुपट्टा देऊन मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांनी केले. संचालन रवींद भुसारी यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)
आधुनिक सिंचन, पीक पद्धतीचा अवलंब करा
By admin | Updated: May 21, 2016 02:15 IST