शिक्षण विभागासमोर तालुका क्रीडा स्पर्धेच्या स्थळाची समस्या कारंजा (घाडगे) : तालुक्यात एकही शासकीय क्रीडा संकुल नसल्यामुळे खेळाडुंची कुचंबणा होत आहे. अशातच येत्या काही दिवसात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. येथे क्रीडा संकुल नसल्याने क्रीडा स्पर्धा कुठे घ्याव्या, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे. एखाद्या खासगी माध्यमिक शाळेला विनंती करून, त्या शाळेच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा घेतली जाते. या माध्यमिक शाळांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शाळा प्रशासन तालुका स्पर्धेकरिता स्वच्छेने मैदान द्यायला तयार नाही. नाईलाजाने केवळ शिक्षण विभागाचा आदेश म्हणून तालुका क्रीडा स्पर्धेसाठी मैदान दिले जाते. अर्थात हक्काचे क्रीडा संकुल नसल्यामुळे खेळाडूंना विविध खेळांचा नियमित सराव करता येत नसल्याने खेळाडूंची कुचंबना होत आहे. कारंजा तालुक्याची लोकसंख्या जवळपास १ लाख आहे. ९० गावे आहेत. जि.प.च्या ६० आणि हायस्कूलच्या २० शाळा आहेत. सहा ज्युनिअर कॉलेज आहे. दरवर्षी बिट स्तरावर जि.प. सर्कल स्तरावर आणि तालुका स्तरावर सांघिक आणि वैयक्तिक खेळांची क्रीडा स्पर्धा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे घेतली जाते. या क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी दरवेळेला एखाद्या खासगी माध्यमिक शाळेला मैदानाची तात्पुरती मागणी केली जाते. शालेय प्रशासन, इच्छा नसताना नाईलाजाने मैदान देते. अर्थात या चार दिवसाचे काळात त्या शाळेच्या शैक्षणिक कार्यात खोळंबा होतो. पालक सुद्धा शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे नाराज होतात. अभ्यासक्रम पूर्ण न होवू शकल्यामुळे त्या शाळेचे शिक्षक सुद्धा मैदान उपलब्ध करून देण्यास उत्साही नसतात. केवळ शासकीय आदेश म्हणून खेळाचे मैदान शिक्षण विभागाला उपलब्ध करून द्यावे लागते. तालुक्याच्या ठिकाणी, शासकीय क्रीडा संकुल उभारले जाणे, अपेक्षित आहे. याकरिता किमान दोन एकर जागा स्थानिक तालुका शहर प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा आहे. देणगी स्वरूपात जागा उपलब्ध न झाल्यास शासकीस जागा उपलब्ध करून देण्यात यावी, किंवा विकत घ्यावी असे गृहीत आहे.
क्रीडा संकुलाअभावी तालुक्यातील खेळाडूंची कुचंबणा
By admin | Updated: August 12, 2016 01:39 IST