आर्वी : उपविभागातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील कृषी विभागाच्या तांत्रिक संर्वगातील अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्या सोडविण्याकरिता तातडीने निर्णय घेण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.या आंदोलनात पाच संवर्ग कृषी विभागाचे तांत्रिक संवर्ग कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग एक अधीक्षक, कृषी सहसंचालक आदी या सहभागी झाले आहेत.कृषी विभागातील तांत्रिक संर्वगातील वेतन श्रेणी व दर्जाबाबत २६ जुलै २००४ च्या नियमाची तातडीने अंमलबजावणी करावी, कृषी विभागातील काही योजना जि.प.कडे हस्तांतरीत कराव्या, नैसर्गिक आपत्तीत शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कृषी व सहकार विभागाचा शासन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. सोबतच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस सरंक्षण द्यावे, कृषी पर्यवेक्षक संवर्गातील पदे कृषी सहायकातून भरवी, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्यात वाढ करावी, साप्ताहिक पेरणी अहवाल, कृषी विभागाकडून तो महसूल विभागाला द्यावा, आत्मांतर्गंत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, कर्मचारी यांना प्रतिनियुक्ती भत्ता द्यावा. या व इतर मागण्यांकरिता कृषी विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू असून त्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. उल्हास नाडे, सरचिटणीस आनंद मून, कोषाध्यक्ष प्रमोद खेडकर, विजय खोडे, दिलीप देशपांडे, रविंद्र राऊत, आर.व्ही. चनशेट्टी, रविंद्र धर्माधिकारी, मिलींद हनुमंते, अशोक देवगीरवार, प्रदीप कवडे, महेंद्र डोळे, एम दांडेकर, विलास मेघे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
कृषी विभागातील तांत्रिक कर्मचारी बेमुदत संपावर
By admin | Updated: August 19, 2014 23:52 IST