सेवाग्राम : वर्धा मार्गावरील बापूरावजी देशमुख सूतगिरणी येथे बसचा थांबा आहे. त्यामुळे येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला. मात्र या प्रवासी निवाऱ्याचा वापर येथील नागरिकांकडून वाहने ठेवण्याकरिता होत असल्याचे दिसते. यामुळे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कडूनिंब व करंजीच्या झाडाचा आश्रय घ्यावा लागतो. उन्हाचा पारा चढत असल्याने प्रवाशांना या प्रवासी निवाऱ्याचा आधार मिळावा अशी अपेक्ष आहे. मात्र हा प्रवासी मार्ग वाहनतळ झाल्याने प्रवाशांना झाडाखाली बसून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला आहे. कामानिमित्त लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच घराबाहेर पडावे लागते. राज्य परिवहन महामंडळाने बस थांब्याच्या ठिकाणी प्रवासी निवारा देण्यात आला आहे. पण अनेक ठिकाणी बसथांबा असताना प्रवासी झाडाखाली किंवा टपरीचा आश्रय घेऊन बसची प्रतीक्षा करताना दिसतात. हाच प्रकार सूतगिरणी जवळील बसथांब्याजवळ पाहायला मिळतो. येथील प्रवासी निवारा सुस्थितीत असताना प्रवाशांसाठी त्याचा उपयोग होताना दिसत नाही. प्रवाशांना बसण्याकरिता असलेला प्रवासी निवारा वाहनतळ झाला आहे. नाईलाजास्तव प्रवाशांना झाडांचा आश्रय घ्यावा लागत आहे. याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.(वार्ताहर)
निवाऱ्यात वाहने तर प्रवासी झाडाखाली
By admin | Updated: April 3, 2017 00:53 IST