समुद्रपूर : नंदोरी चौकाच्या रात्रीच्या वेळेस ट्रक उभा करून झोपलेल्या चालकाला चाकूच्या धाक दाखवून ट्रक चोरणाऱ्या दोघांना सोमवारी समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या २४ तासात पोलिसांना आरोपी अटक करण्यात यश आले. त्यांच्याजवळून मंगळवारी चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटकेत असलेल्यांची नावे चंद्रगुप्त रमेश मांडवकर (२०) रा. चिमूर, प्रमोद रामहरी शेंबेकर (३१) रा. माकोना ता. चिमूर अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे. शुक्रवारी ट्रक चालक नंदकिशोर शिवाजी चौधरी (२६) वर्षे हा ट्रक क्र. एम.एच.२९ टी २५६५ मध्ये कोळसा भरून चंद्रपूरकडून येत होता. रात्री नंदोरी चौकाच्या बाजूला ट्रक उभा करून चालक झोपला असता पहाटेच्या सुमारास तीन आरोपींनी चालकाला चाकूचा धाक दाखवून ट्रकची चाबी हिसकावली. सदर ट्रक जाममार्गे बेलाकडे नेला. चालकाने आरडा ओरड केल्याने त्याचे हात पाय बांधून त्याच्यावर ब्लँकेट टाकून त्याला दाबून ठेवले. बेला मार्गे सिर्सीकडे ट्रक नेवून सिर्सीच्या पुढे उभा केला. जॅक लावून मागील दोन्ही स्टेपनीसह टायर खोलून चालकाचे मोबाईलवरून मालवाहू मिनीडोर बोलावून ५० हजार रुपये किंमतीचे तिनही टायर व मोबाईल, असा ऐवज लंपास केला. चालकाने घटनेबाबत ट्रकमालकाला माहिती देत शनिवारी समुद्रपूर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करून ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक माहुरकर यांनी तपास केला. तपसात अवघ्या २४ तासात आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई जमादार उमेश हरणखेडे, चांगदेव बुरंगे, प्रकाश मैद, विरेंद्र कांबळे यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
चाकूच्या धाकावर ट्रक पळविणारे दोघे ताब्यात
By admin | Updated: March 25, 2015 02:05 IST