आज निवड : भाजप कोअर कमिटी ठरविणार उमेदवार वर्धा : जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवड शनिवारी होऊ घातली आहे. ही निवड चुरशीची असली तरी देवळी विधानसभा मतदार संघाला दोन, तर आर्वी आणि वर्धा विधानसभा मतदार संघाला प्रत्येकी एक सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांच्याकडे एक विषय समिती जाणार आहे. उर्वरित चार विषय समित्यांसाठी ही निवड होणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे या समित्यांवरही भाजपचाच कब्जा असणार आहे. या समित्यांवर नेमकी कुणाची वर्णी लावावी, या दृष्टीने भाजप कोअर कमिटीचा निर्णय अंतिम राहील, अशी भाजप गोटातील माहिती आहे. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये देवळी विधानसभा मतदार संघातील भिडी गटाचे सदस्य मुकेश भिसे आणि आंजी(मोठी) गटाच्या सदस्य जयश्री सुनील गफाट यांची निवड निश्चित मानली जात आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातून एका सदस्याचीही सभापचिपदी वर्णी लागणार आहे. मात्र नेमके नाव समोर न आल्यामुळे वेळेवर कुणाचे नाव पुढे येते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. माजी आमदार दादाराव केचे यांच्या मर्जीतील सदस्याला सभापतिपद मिळतील, असेही बोलले जात आहे. वर्धा विधानसभा मतदार संघाच्या वाट्याला एक पद येणार, असे बोलले जात आहे. यासाठी येळाकेळी गटाच्या सोनाली अशोक कलोडे आणि नालवाडी गटाच्या नुतन प्रमोद राऊत यांची नावे आघाडीवर आहे. परंतु समाज कल्याण पद हे आरक्षित असल्यामुळे नुतन राऊत यांचे पारडे जड मानले जात आहे. निवडणुकीत भाजप आणि रिपाइं युती होती. यामध्ये सेवाग्राम गटातून रिपाइंचे विजय आगलावे निवडून आले. त्यांनीही सभापतिपदासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली. मात्र सेवाग्राम हा गट देवळी विधानसभा मतदार संघात येते. या मतदार संघातून भिसे आणि गफाट यांची नावे ताकदीनिशी पुढे आल्यामुळे आगलावे यांचा दावा कितपत यशस्वी होतो, हे बघण्यासारखे आहे. शनिवारी होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीत नेमके काय होते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
देवळीला दोन, तर वर्धा आणि आर्वीला एकेक सभापतिपद जाणार
By admin | Updated: April 1, 2017 01:02 IST