हिंगणघाट : जगन्नाथ वॉर्डातील एका घरात भरदुपारी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला़ चोरीत अडसर ठरू पाहणाऱ्या १४ वर्षीय युवतीच्या गळ्याला फास आवळण्याचा प्रयत्न केला; पण तिने प्रतिकार केला़ यानंतर तिला ब्लेडसारख्या शस्त्राने जखमी करीत पळ काढला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास जगन्नाथ वॉर्डात घडली़ गजबजलेल्या जगन्नाथ वॉर्डात मस्जिद असून दुपारी प्रार्थनेची वेळ चोरट्याने साधली़ याच परिसरात ऩप़ उपाध्यक्ष गुड्डू शर्मा यांचे घर आहे़ ध्वनिक्षेपकावरून प्रार्थना सुरू असताना त्यांच्या घरात मागील बाजूने अज्ञात चोरटा शिरला़ त्याने वरच्या माळ्यावर अभ्यास करीत असलेली त्यांची मुलगी मानसी (१४) हिच्या गळ्यावर फास फेकला़ तिने दोन्ही हाताने गळफास अडवित झटका देताच पूर्णत: काळे कपडे परिधान केलेला युवक खाली कोसळला. चोरटा पुन्हा उभा होताच तिने त्याला घड्याळ, उशी फेकून मारली़ यानंतर चोरट्याने तिला बेल्डसारख्या शस्त्राने जखमी केले. यावेळी दुसरी मुलगी अंजली (७), तिची आई अनीता (४०) तसेच शेजारची दोन लहान मुले घरी खालच्या भागात होते़ मदतीसाठी आरडाओरड करताच तिची आई अनीता धावून आली. सर्वप्रथम मानसी व इतरांना घेऊन ती घराबाहेर आली. आवाज ऐकून नागरिकही पोहोचले; पण तोपर्यंत चोरटा पसार झाला होता़ या घटनेमुळे नागरिक धास्तावले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याला ताब्यात घेण्याची मागणी होत आहे़ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पूढील तपास सुरू आहे़(तालुका प्रतिनिधी)
युवतीने केले चोरट्याशी दोन हात
By admin | Updated: November 2, 2014 22:46 IST