वर्धा : विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे देयक काम पूर्ण होऊनही मिळत नसल्याने दोन कंत्राटदारांनी पालिकेच्या परिसरात अंगावर रॉकेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी दोघांनाही वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. महोमद जाकीर महोमद जलील व पी.एच.पांडे अशी या कंत्राटदारांची नावे आहेत.कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, कामांच्या फाईलवर नगराध्यक्षांनी हेतु पुरस्सर स्वाक्षऱ्या केल्या नाही. परिणामी गत काही महिन्यांपासून या कंत्राटदारांची देयके रखडली आहे. ती मिळण्याकरिता वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याच्या भेटी घेवून त्यांना निवेदने देण्यात आली; परंतु त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. या प्रकरणी कंत्राटदारांनी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेचे अभियंता अतुल पाटील आणि नगराध्यक्षाचे पुत्र प्रशांत कुत्तरमारे यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणाचा सूड उगविण्याकरिता हा प्रकार होत असल्याचा आरोप कंत्राटदारांचा आहे. बांधकामे पूर्ण होऊन वर्ष लोटले; परंतु त्यावर स्वाक्षऱ्या केल्या नसून त्या फाईल्स यांच्या घरी धुळखात असल्याचा आरोप करीत महम्मद जाकीर व पी.एच. पांडे या दोघांनी आत्मदहानाचा प्रयत्न केला. यावेळी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भगवान बावणे, देवराव येनकर, जयेश डांगे, अनिल वैद्य, राजू शंभरकर यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. यावेळी संतप्त जमावाने मुख्याधिकारी हरिश्चंद्र टाकरखेडे यांचे दालन गाठत त्यांना चांगलेच धारेवर धरले. (प्रतिनिधी)कंत्राटदार आत्मदहन करणार असल्याची माहिती मिळाली. ती पोलिसांना दिली. पालिकेच्या परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बांधकाम पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला असून त्या बांधकामाचे देयक मिळाले नाही ते मिळावे अशी त्यांची मागणी होती. आंदोलनकर्ते दोन्ही कंत्राटदारांच्या बांधकाम देयकाची फाईल माझ्याकडे नसून ती नगराध्यक्षांकडे आहे. या प्रकरणी लक्ष देत वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल. - हरिश्चंद्र टाकरखेडे, मुख्याधिकारी न.प. वर्धा
वर्धा पालिकेच्या परिसरात दोन कंत्राटदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: May 3, 2015 01:45 IST