ंतळेगाव(श्यामजीपंत) : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील सत्याग्रही घाटामधील वळणावर सुसाट वेगात येणारी दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. दुचाकीची धडक बसताच तिने पेट घेतला. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील श्यामसन्स पिटर (फान्सोशिस) (३५) रा. झिंगाबाई टाकळी हा एमएच ३१-३६४९ या दुचाकीने नागपूरकडून अमरावतीला जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटाच्या वळणावर भरधाव वेगात असणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळली. यात अचानक दुचाकीने पेट घेतला. यामध्ये दुचाकी चालक गाडीसह ६० टक्के भाजल्या गेला. गंभीर अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराला ओरिएंटल कंपनीच्या रुग्णवाहिकेने आर्वी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ त्याला वर्धा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची नोंद पोलिसात असून तपास जमादार घनश्याम लांडगे व ताराचंदी करीत आहेत. (वार्ताहर)
दुभाजकावर आदळताच दुचाकी पेटली; चालक गंभीर
By admin | Updated: December 7, 2014 22:55 IST