आष्टी (शहीद) : विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ तालुक्यातील आनंदवाडी गावातील ट्रान्सफार्मर गत १५ दिवसांपासून बंद आहे़ यामुळे गावात कमी होल्टेजचा प्रश्न गंभीर झाला आहे़ कमी-अधिक विजेच्या दाबामुळे घरगुती उपकरण जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली; पण जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे़सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हापासून संरक्षणासाठी कुलर लावावे लागत आहेत; पण विजेच्या कमी-अधिक प्रवाहामुळे कुलरच्या मोटारी जळत आहेत़ अनेकांच्या घरातील फ्रीजचे कॉम्प्रेसर जळाले़ विहिरीवरील विद्युत पंपाबाबतही प्रश्न गंभीर झाला आहे़ गावातील पाणी प्रश्नानेही गंभीर रूप धारण केले आहे़ मुबलक जलसाठा उपलब्ध असताना जळालेल्या मोटरमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ परिणामी, नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ विजेची उपकरणे महागडी असल्याने ती वारंवार दुरूस्ती करणे, ही परवडणारी बाब नाही़ यामुळे वीज कंपनीवर संताप व्यक्त केला जात आहे़गत १५ दिवसांत गावातील ३० कुलरच्या मोटर, १२ विहिरींवरील मोटारी जळाल्या आहेत़ शिवाय ६० पंख्यांच्या मोटारीही जळाल्यात़ विजेच्या कमी-अधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असताना अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ याबाबत गावातील सागर कळसकर यांच्यासह नागरिकांनी वीज कंपनीला माहिती दिली़ कंपनीचे अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे दिसते़ यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ वीज कंपनीचे अभियंते सतत गैरहजर असतात़ सिंचनाच्या विहिरींची वीज जोडणी करून देण्यासही टाळाटाळ केली जात आहे़ यामुळे नागरिकांनी उपोषण करण्याचा मानसही व्यक्त केला़ गावात विजेच्या ताराही ठिकठिकाणी लोंबकळलेल्या दिसतात़ नागरिक तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे़ बाभळीच्या झाडाला लागून वाहिन्या असल्याने कुठल्याही क्षणी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही़ याप्रकरणी वरिष्ठांना निवेदन पाठविले असून काय कारवाई होते, याकडे सर्र्वांचे लक्ष लागले आहे़(प्रतिनिधी)
१५ दिवसांपासून ट्रान्सफार्मर बंद
By admin | Updated: April 29, 2015 01:54 IST